राज्यात अवकाळी उन्हाचा तडाखा ; 3 जिल्ह्यांना येलो अलर्ट !
दै. बातमीदार । १७ एप्रिल २०२३ । राज्यात बहुतांश ठिकाणी कमाल तापमान 40 अंशांवर गेले आहे. त्यामुळे दुपारी उन्हाच्या काहिलीने अंगाची लाही लाही होत आहे. दुसरीकडे, भरउन्हाळ्यात काही ठिकाणी वादळी वारे, मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस व गारपीटदेखील होत आहे. त्यामुळे सध्या विचित्र हवामानाचा सामना नागरिकांना करावा लागत आहे.
राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे कमाल तापमानात चढ-उतार होत असला तरी उन्हाच्या झळा तापदायक ठरत आहेत. पुढील दोन दिवसांत राज्याच्या तापमानात आणखी 2 अंशांनी वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. गेल्या 24 तासांमध्ये जळगाव येथे राज्यातील उच्चांकी 41 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. याशिवाय यवतमाळ, धुळे येथे तापमान 49 अंशांवर होते. सध्या छत्रपती संभाजीनगरचा पारा 39 अंशांवर असून त्यातही वाढ होण्याची शक्यता आहे.
आज मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. आज मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, नांदेड येथे येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. याशिवाय दक्षिण व मध्य महाराष्ट्रातही तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. एकीकडे अवकाळी पावसाचे सावट असतानाच राज्याच्या कमाल तापमानात 2 ते 4 अंशांनी वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. उन्हाचा कडाका वाढल्याने नागरिकांना विशेष काळजी घेणे गरजेचे झाले आहे. नवी मुंबईतील खारघर येथे रविवारी झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात 11 जणांचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे. या कार्यक्रमासाठी 7 लाख लोक सकाळी 8 वाजेपासून दुपारी 4 वाजेपर्यंत भरउन्हास बसून होते. त्यामुळे अनेकांना उन्हाचा त्रास झाला. 50 जणांवर अजून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यावरुन पुणे, हवामान विभागाचे शास्त्रत्र के. एस. होसाळीकर यांनीही काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. खारघरजवळच असलेल्या ठाणे, कोपरखैरणे येथे रविवारी कमाल तापमान 38 अंश सेल्सिअस नोंदवले गेले होते. अशात लोक अधिक वेळ उन्हात असल्याने त्यांना उष्माघात तसेच डिहायड्रेशनचा त्रास झाला असावा.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम