वीरप्पन गॅंगचा कोरोनातील घोटाळा २३ रोजी येणार बाहेर ; मनसे !
दै. बातमीदार । २१ जानेवारी २०२३ । जगासह देशात कोरोनाने जेव्हा हाहाकार माजला होता त्यावेळी महाविकास आघाडीने प्रत्येक जिल्ह्यात आरोग्य यंत्रणा राबविली होती, यावरच मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी ठाकरे गटावर भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप केला आहे.
‘वीरप्पन गॅंगचा कोरोना काळातला मोठा घोटाळा सोमवार 23 जानेवारीला उघड करणार पुराव्यासहीत’, असे संदीप देशपांडे यांनी म्हटले आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुका लवकरच होणार आहे. या पार्श्वभूमीवर अनेक पक्ष सध्या मैदानात उतरले असून एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. भाजप आणि शिवसेना आमनेसामने येऊन ठाकले आहेत. भाजपकडून नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत प्रचाराचा नारळ फोडण्यात आला आहे.
भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी कोरोना काळात ठाकरे गटातील नेत्यांनी मोठे आर्थिक घोटाळे केल्याचा आरोप केलेला आहे. यात त्यांनी किशोरी पेडणेकर यांच्यावर गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत. असे असतानाच संदीप देशपांडे 23 जानेवारी रोजी नेमका कोणता घोटाळा समोर आणणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. एका व्यक्तीने काही कागदपत्रे आणि पेन ड्राईन शाखेत दिली. त्या व्यक्तीचे नाव समजू शकले नाहीत. मात्र मी तो पेन ड्राईव्ह पाहिला, कागदपत्रे पाहिली. विरप्पन गँगने कोरोना काळात मुंबईची लूट केली. या लुटीचे ढळढळीत पुरावे या पेन ड्राईव्हमध्ये आहेत. सोमवारी 23 जानेवारी रोजी आम्ही हे सगळे माध्यमांसमोर मांडणार आहोत. तसेच पोलिसात तक्रारही देणार आहोत. अँटी करप्शनकडेही तक्रार करणार असल्याचे संदीप देशपांडे यांनी म्हटले आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम