ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचनादीदी लाटकरांनी घेतला शेवटचा श्वास !
दै. बातमीदार । ५ जून २०२३ । अनेक लोकप्रिय भूमिकांमुळे घराघरात पोहोचलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचनादीदी लाटकर यांचे वयाच्या 94 व्या वर्षी निधन झाले आहे. दादर इथल्या शुश्रुषा रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सुलोचनादीदी लाटकर यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून खालावली होती. रविवारी तब्येत बिघडल्याने त्यांना दादरच्या शुश्रृषा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र इथेच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचे नातू पराग यांनी ही माहिती दिली आहेत. सुलोचनादीदी यांचे पार्थिव त्यांच्या प्रभादेवी येथील घरी सकाळी अंत्यदर्शनसाठी ठेवण्यात येणार असून सायंकाळी शिवाजी पार्क येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदी यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दुःखदायक आहे. सुमारे सहा दशके सुलोचना दीदींनी आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. रुपेरी पडद्यावर त्यांनी साकारलेल्या सात्त्विक, सोज्वळ अशा वात्सल्यमूर्ती आईच्या भूमिका कोट्यवधी रसिकांच्या मनात घर करून आहेत. त्यांच्या निधनाने सकस आणि निरागस अभिव्यक्तीपासून चित्रपटसृष्टी पारखी झाली आहे. पद्मश्री स्व. सुलोचना लाटकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली, असे ट्विट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी केले आहे. तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनीही ट्विट करून सुलोचनादीदी यांना श्रद्धांजली वाहिली.
‘पद्मश्री’ तसेच ‘महाराष्ट्र भूषण’ने सन्मानित ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचनादीदी यांनी हिंदीसह मराठी चित्रपटसृष्टीमध्ये आपल्या दमदार अभिनयाची छाप पाडली. त्यांचा जन्म 30 जुलै 1928 रोजी झाला. 1943मध्ये त्यांनी अभिनयाच्या विश्वात पदार्पण केले. मराठी आणि हिंदी सिनेमांत चरित्र अभिनेत्री म्हणून त्यांनी काम केले. अभिनयाच्या क्षेत्रात सुलोचना यांना भालजी पेंढारकर यांनी मार्गदर्शन केले. त्यांच्या तालमीत सुलोचनादीदी तयार झाल्या. आपल्या सोज्वळ दिसण्याने आणि सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केले. प्रेक्षकांच्या मनात सुलोचनादीदी म्हणजे सोज्वळ, शांत आई अशी प्रतिमा त्यांनी निर्माण केली. सिनेमांमध्ये त्यांनी घरंदाज भूमिका साकारल्या होत्या.
सुलोचनादीदींनी 250हून अधिक मराठी तसेच हिंदी सिनेमांत आपल्या अभियानाची छाप पाडली. ‘वहिनीच्या बांगड्या’, ‘मीठ भाकर’, ‘धाकटी जाऊ’ यांसारखे त्यांचे अनेक चित्रपट तुफान गाजले. ‘सांगत्ये ऐका’, ‘मोलकरीण’, ‘मराठा तितुका मेळवावा’, ‘साधी माणसं’, ‘एकटी’ हे सुलोचना दीदींच्या कारकीर्दीतील अजरामर चित्रपट ठरले. मराठी सिनेसृष्टी गाजवल्यानंतर हिंदी चित्रपटसृष्टीतही सुलोचनादीदींनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. त्यांचा मोतीलाल यांच्या बरोबरचा ‘मुक्ती’ हा चित्रपटही गाजला. त्यानंतर त्यांनी सहकलाकार म्हणून पृथ्वीराज कपूर, नाजिर हुसैन, अशोक कुमार यांच्या सोबतही काम केले. नायिका म्हणून त्यांनी 30 ते 40 चित्रपट केले असतील. ‘दिल देके देखो’ या 1959 मधील सिनेमात त्यांनी पहिल्यांदा आईची भूमिका साकारली. त्यानंतर 1995 पर्यंत त्यांनी अनेक आघाडीच्या अभिनेत्यांच्या ‘आई’ची भूमिका वठवली.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम