सीबीआय चौकशीला वानखेडे अनुपस्थित !
दै. बातमीदार । २५ मे २०२३ । कॉर्डिलिया क्रूझवरील छापेमारीदरम्यान अभिनेता शाहरूख खान यांचा मुलगा आर्यन खान याला अटक न करण्यासाठी २५ कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप असलेले एनसीबीचे तत्कालीन विभागीय संचालक समीर वानखेडे हे बुधवारी सीबीआय चौकशीसाठी अनुपस्थित राहिले.
गेल्या शनिवार व रविवारी त्यांची सीबीआयने चौकशी केली होती. त्यानंतर बुधवारी पुन्हा एकदा सीबीआयने त्यांना चौकशीसाठी बोलावले होते. मात्र, वैयक्तिक कारणांमुळे आपण चौकशीला उपस्थित राहू शकत नसल्याचे त्यांनी सीबीआयला कळविले. वानखेडे यांना पुढील तारखेचे समन्स सीबीआयने अद्याप जारी केलेले नाही.
आर्यन खान प्रकरणात २५ कोटींची खंडणी मागणे, छापेमारी व अटकेची सदोष प्रक्रिया राबविणे, परदेश प्रवासाबद्दल सरकारला व्यवस्थित माहिती न देणे, महागड्या घड्याळांची खरेदी-विक्री व मालमत्ता व उत्पन्न यांच्यात विसंगती असणे, असे अनेक आरोप सीबीआयने वानखेडे यांच्यावर ठेवले आहेत. आर्यन खान प्रकरणानंतर वानखेडे व त्यांच्या पथकातील अधिकाऱ्यांची एनसीबीने विभागीय चौकशी केली होती. त्या विभागीय चौकशीच्या अहवालात त्यांच्यावर जो ठपका ठेवण्यात आला आहे, त्या आधारे सीबीआयने ११ मे रोजी त्यांच्याविरोधात खंडणी व भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम