फरार ड्रग्जमाफिया ललित पाटीलवर हॉस्पिटलचे डीनने केले होते उपचार ?

बातमी शेअर करा...

बातमीदार | २८ ऑक्टोबर २०२३

ड्रग्जमाफिया ललित पाटील याच्यावर ससून रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. मात्र तो फरार झाल्यापासून त्याच्यावर कोणते डॉक्टर उपचार करत होते, याबाबत ससून प्रशासनाकडून गुप्तता बाळगली जात होती. मात्र रुग्णालयातील एका रजिस्टरवरून त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरचे नाव पुढे आले आहे. त्याच्यावर उपचार करणारे दुसरे-तिसरे कुणी नसून, खुद्द ससून हॉस्पिटलचे डीनच असल्याची शक्यता पोलीस तपासात पुढे आली आहे.

ड्रग्जमाफिया पाटील याने २ ऑक्टोबरला पुण्यातील ससून रुग्णालयातून पलायन केले होते. त्यानंतर १६ दिवसांनी तो मुंबई पोलिसांच्या हाती लागला. पाटील आणि त्याच्या भावाचा नाशिकमधील अमली पदार्थांचा कारखाना उद्ध्वस्त करण्यात आला आहे. त्याचबरोबर तेथील गिरणा नदीच्या पात्रातही त्याने कोट्यवधी रुपयांचे दडवलेले अमली पदार्थ हस्तगत करण्यात आले. पाटील याच्यावर कोणत्या राजकीय नेत्याचा वरदहस्त आहे, यावरून राज्यातील राजकारण तापले आहे. कोणत्या विकारामुळे ललित पाटील ससून रुग्णालयात दाखल होता व त्याच्यावर कोणते डॉक्टर उपचार करत होते ? याबाबत गेल्या काही दिवसांपासून प्रश्न विचारले जात होते.

मात्र ससून प्रशासन आणि आरोग्य विभागाकडून त्याबाबत मौन पाळण्यात आले आहे. आता या रुग्णालयातील बहुचर्चित वॉर्ड क्र. १६ मधील रजिस्टरमधील नोंदी माध्यमांच्या हाती लागल्या. त्यानुसार, हर्नियाच्या विकाराबाबत पाटील याच्यावर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकुर उपचार करत होते, अशी माहिती पुढे आली आहे. एकीकडे हा विकार असल्याचे भासवून रुग्णालयात दाखल झालेला पाटील प्रत्यक्षात तेथील तारांकित हॉटेलमध्ये मैत्रिणींसमवेत मौजमजा करत असल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. त्याच्या दोन्ही मैत्रिणींनाही अटक करण्यात आली आहे. एकंदर प्रकारामुळे आरोग्य प्रशासन संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम