मृत्यूनंतर आधारकार्डचे काय होणार ; सरकार घेतेय निर्णय !
दै. बातमीदार । २१ मार्च २०२३ । देशात आधारकार्ड हे प्रत्येक व्यक्तीसाठी ओळख म्हणून ठरत आहे. त्यावर अनेक शासकीय योजनेचा लाभ देखील जनता घेत आहे. मात्र, एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर आधारकार्डचे काय हाेते आणि नातेवाईकांनी काय करायला हवे, याबाबत अनेकांना माहिती नसते. यासाठी आता आधार प्राधिकरण ‘यूआयडीएआय’ने पुढाकार घेतला असून, मृत व्यक्तीचे ‘आधार’ निष्क्रिय करण्याबाबत यंत्रणा उभारण्यासाठी काम सुरू केले आहे.
मृत्यूनंतर संबंधित व्यक्तीचे आधारकार्ड रद्द अथवा निष्क्रिय करण्यासाठी काेणतीही तरतूद आणि व्यवस्था सध्या नाही. याबाबत केंद्र सरकारने लाेकसभेत माहिती दिली हाेती. त्यामुळे आता मृत व्यक्तीचे आधारकार्ड रद्द करण्यासाठी काही प्रक्रिया निश्चित करण्यात येणार आहे.
रद्द करणे का आवश्यक?
सरकारने जन्म आणि मृत्यू नाेंदणी नियमांमध्ये दुरुस्ती करण्यासाठी यूआयडीएआयकडून सूचना मागविल्या हाेत्या. मृत्यू प्रमाणपत्र देण्यापूर्वी आधार क्रमांक नाेंदविण्याबाबत त्यात उल्लेख हाेता. आधारकार्ड रद्द न केल्यास त्याचा गैरवापर हाेण्याची भीती असते.
कशी असेल प्रक्रिया?
– सरकारच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत्यू प्रमाणपत्र मिळाल्यानंतर कुटुंबीयांना आधार क्रमांक बंद करण्यासाठी कागदपत्रे पाठविण्यात येतील.
– कुटुंबीयांची मंजुरी मिळाल्यानंतर आधार क्रमांक रद्द हाेईल. त्यासाठी कुटुंबीयांना मृत्यू प्रमाणपत्र जारी झाल्यानंतर आधार दाखवावे लागेल.
– राज्य सरकारांना याची अंमलबजावणी करावी लागणार आहे. त्यामुळे त्यांच्याशी चर्च सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.
जन्मत:च ‘आधार’
देशभरात जन्म प्रमाणपत्रासाेबतच आधार क्रमांक नाेंदणीचीही सरकारची याेजना आहे. सध्या २० राज्यांमध्ये ही यंत्रणा सुरू आहे. पालकांची माहिती त्यासाठी घेतली जाते. मूल ५ आणि १५ वर्षांचे झाल्यानंतर त्याचे बायाेमेट्रिक्स घेतले जाते.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम