
मी देशाचा अध्यक्ष तेव्हा हे सर्व राज्याचे अध्यक्ष : शरद पवार
दै. बातमीदार । २३ ऑक्टोबर २०२२ । राज्याच्या राजकारणातील मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकी मोठ्या मनाने शरद पवार यांनी भाजप सोबत युती करीत फडणवीस यांचे विश्वासू अमोल काळे यांना निवडून आणले पवार यांच्या या खेळीवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असताना आज स्वत: शरद पवार यांनी आपल्या या निर्णयाबाबत स्पष्टीकरण दिले आहे.
एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शरद पवार म्हणाले, आशिष शेलार जवळपास ५ वर्षांपुर्वीही मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष होते. काही क्षेत्रं अशी असतात, जिथे राजकारण आणायचे नसते. खेळाडूंना प्रोत्साहित करणे, त्यांना खेळासाठी विविध सुविधा देणे, हे आमचे काम आहे. त्यांच्या खेळात आम्ही कधी पडत नाहीत. सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर यांच्यासारखे उभं आयुष्य क्रिकेटला योगदान दिलेल्या लोकांच्या ज्ञानाचा उपयोग नवीन खेळाडू निवडणे आणि त्यांना तयार करणे यासाठी व्हायला हवा. हे काम त्यांचं आहे. त्यांना उद्या स्टेडियम बांधायचे काम जमणार नाही. ते काम आमचं आहे. कोणते खेळाडू निवडायचे हे काम त्यांचे आहे.
‘खरंतर लोकांना हे माहिती नाही की मी बीसीसीआयचा अध्यक्ष होतो, तेव्हा गुजरातचे प्रतिनिधी नरेंद्र मोदी होते. मोदी माझ्या बैठकीला हजर होते. त्यावेळी ते गुजरातचे मुख्यमंत्री होते. तेव्हाच अरुण जेटली दिल्लीचे तर आत्ता केंद्रीय मंत्री असलेले अनुराग ठाकूर हिमाचल प्रदेशचे अध्यक्ष होते. त्यामुळे मी देशाचा अध्यक्ष आणि हे सगळे राज्यांचे अध्यक्ष असं आम्ही सर्वांनी तेव्हा एकत्र काम केलं. तेव्हा लोकांना ते लक्षातही आलं नाही. पण यावेळी त्याची चर्चा सुरू झाली. तात्पर्य एकच, की या ठिकाणी राजकारण आणायचं नाही’ असा किस्सा शेअर करत शरद पवारांनी होणाऱ्य चर्चेला पुर्णविराम दिला आहे. भाजप आमदार आशिष शेलार यांची नुकतीच बीसीसीआयचे कोषाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. मात्र, त्याआधी त्यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरला होता. या निवडणुकीमध्ये आशिष शेलार यांनी तयार केलेल्या पॅनलमध्ये खुद्द शरद पवार हेही होते. शरद पवारांनी या निवडणुकीत आशिष शेलार यांना पाठिंबा जाहीर केला होता. त्यानंतर राजकीय वर्तुळात आशिष शेलारांना पाठिंबा का दिला? असे अनेक प्रश्न उपस्थित होत होते.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम