‘या’ प्रकरणी भाजपवाले शांत का ? ; संजय राऊत !
दै. बातमीदार । २२ जुलै २०२३ । देशातील मणिपूरमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात हिंसाचार सुरु असून मणिपूरमध्ये जमावाने दोन शेकडोंच्या जमावाने महिलांची नग्न धिंड काढल्याचा एक व्हिडीओ बुधवारी समाजमाध्यमांत व्हायरल झाला. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. याप्रकरणी आतापर्यंत पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर, पोलीस अन्य आरोपींचा शोध घेत आहेत. खरंतर, ही घटना दोन महिन्यांपूर्वीची आहे. परंतु याप्रकरणी दोन महिने कोणतीही कारवाई झाली नव्हती. देशभरातून येत असलेल्या संतप्त प्रतिक्रिया आणि थेट सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांनी जाब विचारल्यानंतर मणिपूरमधील प्रशासन जागं झालं आणि त्यानंतर याप्रकरणी कारवाई सुरू झाली. तर विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. यात ठाकरे गटाचे नेते संजय राऊत देखील मागे नाहीत.
खासदार संजय राऊत म्हणाले, मणिपूरमध्ये हिंसाचार सुरू आहे, भारतीय सैन्यावरही हल्ले होत आहेत. परंतु तिथलं सरकार मूकदर्शक बनून फक्त तमाशा बघत आहे. तिथली परिस्थिती काश्मीरपेक्षा भयंकर आहे. परंतु भाजपा तिथे लक्ष घालत नाही कारण तिथे हिंदू-मुस्लीम राजकारण करता येत नाही. मणिपूरमधील हिंसाचार आणि तिथल्या घटनांचा भाजपाला राजकीय फायदा होत नाही. म्हणून याप्रकरणी भाजपावाले शांत आहेत. या घटनेत तिथे एखादा दुसऱ्या समुदायाचा, अल्पसंख्याक समाजाचा किंवा मुसलमान असता तर यांनी (भाजपा) आतापर्यंत देशात गोंधळ घातला असता. आपल्या देशाचं दुर्भाग्य आहे की, या प्रकरणावर मोदीजी इतके दिवस काही बोलले नाहीत, केंद्र सरकार काही भूमिका घेत नाही, तिथले राज्यपाल काही बोलत नाहीत. यावर आपल्या राष्ट्रपतीसुद्धा काहीच बोलत नाहीत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नुकतंच केलेलं एक वक्तव्य खूप महत्त्वाचं आहे. ममता बॅनर्जी म्हणाल्या की, या देशातील महिला सरकार बदलतील. आम्हालाही तसंच वाटतंय. मणिपूरमधील अत्याचाराच्या घटनेनंतर देशातल्या महिलांमध्ये खूप संताप आहे. त्यांना या घटनेचं खूप दुःख झालं आहे. मणिपूरची घटना असो, अथवा इतर ठिकाणी घडलेल्या घटना असतील, त्याबाबत सरकारविरोधात संताप आहे. त्यामुळे देशातल्या महिलांनी हे सरकार बदलण्याचा निर्णय घेतला आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम