आळंदी पोलिस व वारकऱ्यांमध्ये का झाली झटापट?

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १२ जून २०२३ ।  राज्यात नुकतेच आळंदी येथे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी प्रस्थान सोहळ्यात पोलिसांनी लाठीमार केला, असा आरोप वारकऱ्यांनी केला आहे. तसे व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मात्र, आळंदी येथे रविवारी नेमके काय घडले? पोलिस व वारकऱ्यांमध्ये झटापट का झाली? घटनेला सुरूवात कुठून झाली?, या प्रश्नांची उत्तरे देणारा व्हिडिओ आळंदी पोलिसांनी जारी केला आहे.

आळंदीमध्ये काल जे काही घडले, त्याचे चित्रण पोलिसांनी केले आहे. पोलिसांनी वारकऱ्यांवर नाहक लाठीमार केला, असा आरोप केला जात आहे. मात्र, पोलिसांनी जारी केलेल्या व्हिडिओनुसार, शेकडो वारकरी बॅरिकेड्स तोडून येथील मंदिरात जाण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. पोलिस वारकऱ्यांना रोखण्याचा प्रयत्न करतात. मात्र, वारकऱ्यांचा प्रचंड लोंढा व मोजकेच पोलिस यामुळे वारकरी पोलिसांना जुमानत नाहीत. मंदिरात जाण्याच्या प्रयत्नात वारकरी पोलिसांना ढकलतात. यादरम्यान एक पोलिस कर्मचारी खाली कोसळतो, असेही व्हिडिओमध्ये दिसत आहे.

​एक पोलिस कर्मचारी खाली कोसळल्यानंतर वारकरी वेगाने पोलिसांचे कडे तोडून पुढे जातात. यावेळी तेथे उपस्थित असलेले इतर पोलिस तसेच राज्य राखीव दलाची तुकडी समोर येते. ते वारकऱ्यांना थांबवण्याचा प्रयत्न करतात. तरीही वारकरी पुढे जात राहतात. त्यानंतर पोलिस लाठी बाहेर काढत वारकऱ्यांना मागे नेण्यासाठी जमिनीवर तर काही वारकऱ्यांवर सौम्य लाठीमार करताना व्हिडिओत दिसतात. आळंदी येथे वारकऱ्यांवर लाठीचार्जची घटना घडताच विरोधकांनी राज्य सरकारला धारेवर धरले आहे. तर, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वारकऱ्यांवर लाठीचार्ज झाल्याचे नाकारले आहे. त्यानंतर एका वारकऱ्याचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झाला. त्यात विशाल पाटील नावाच्या वारकऱ्याने पोलिसांना आम्हाला एकांतात नेऊन मारले, असा गंभीर आरोप केला. व्हिडिओमध्ये वारकऱ्याच्या शर्टावर डाग तसेच त्यांचे शर्टही फाटलेले दिसत आहे. त्यावरून विरोधकांनी पुन्हा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धारेवर धरत सरकारवर हल्लाबोल केला आहे. अशात नेमकी परिस्थिती काय घडली, हे सांगण्यासाठीच पोलिसांनी व्हिडिओ जारी केल्याचे म्हटले जात आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम