मुख्यमंत्री शिंदे यांचा डाव विस्कटणार कि सावरणार ? आज होणार स्पष्ट !
दै. बातमीदार । ११ मे २०२३ । राज्यात ११ महिन्यापूर्वी शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी ४० आमदार घेत भाजपच्या सोबत जात राज्यात सत्ता स्थापन केली होती. तर शिवसेना आमचीच असल्याचे सांगत धनुष्यबाण चिन्ह देखील ठाकरे यांच्याकडून शिंदे यांनी घेतले होते. त्यावर आज शिवसेनेच्या 16 आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडलेला डाव सावरणार की विस्कटणार हे आज स्पष्ट होणार आहे.
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल एकमताने येण्याची शक्यता असून सरन्यायाधीश चंद्रचूड हा निकाल वाचून दाखवणार आहेत. घटनेच्या दहाव्या अनुसूचीतील पक्षांतर बदी कायद्यासंबंधी हा निकाल येणार आहे. 1973 सालच्या केशवानंद भारती खटल्याप्रमाणे आजचा निकाल हा एक लँडमार्क जजमेंट असण्याची शक्यता आहे.
गेल्या वर्षी 30 जून रोजी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची आणि देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तत्पूर्वी सूरत ते गुवाहाटी आणि तेथून गोवामार्गे महाराष्ट्रात झालेलं सत्तांतर संपूर्ण भारतात आजही चर्चेचा विषय आहे. या पार्श्वभूमीवर सत्तासंघर्षाचा निकाल कुणाच्या बाजूने लागेल यांची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.
महाराष्ट्रात विधानपरिषद निवडणुकीनंतर 20 जून 2022 रोजी जे नाट्य रंगलं, त्यातून सत्तांतरापर्यंत आणि शिवसेनेच्या फुटीपर्यंत अनेक घडामोडी घडल्या. त्यावेळी बंडखोरी केलेल्या 16 आमदारांना अपात्र करण्याची नोटिस त्यावेळचे विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवाळ यांनी दिली होती. पण त्याआधीच त्यावेळचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला आणि राज्यात शिंदे-फडणवीस यांचे सरकार सत्तेत आले. तेव्हापासून हे प्रकरण सुप्रीम कोर्टात आलं.
घटनापीठाचे दोन निकाल प्रलंबित
हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेल्यानंतर 14 फेब्रुवारी ते 16 मार्च अशी सलग सुनावणी झाली आणि तेव्हापासून हा निकाल राखीव आहे. ज्या घटनापीठाला हा निकाल द्यायचा आहे त्या घटनापीठाचे दोन निकाल प्रलंबित आहेत. एक महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा आणि दुसरा दिल्ली आणि केंद्र सरकारमधल्या अधिकारांच्या वादाचा. दिल्ली केंद्र सरकारचं प्रकरण महाराष्ट्रातील प्रकरणाच्या आधीच पूर्ण झालं आहे. 17 जानेवारीपासून हाही निकाल प्रलंबित आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम