चाकूने वार करून ठार करेल ; खा.राणा यांना धमकी !
बातमीदार | २२ ऑगस्ट २०२३ | राज्यातील अमरावती येथील खासदार नवनीत राणा हे नेहमी आंदोलन करण्याच्या माध्यमातून चर्चेत येत असतात पण आता जरा वेगळ्या कारणाने ते चर्चेत आले आहे. एक खळबळजनक घटना घडली आहे. नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. गेल्या चार ते पाच दिवसांपासून नवनीत राणा यांच्या मोबाईलवर विठ्ठलराव नावाची व्यक्ती चाकूने वार करून ठार करू, अशी धमकी देत असल्याचे पोलीस तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
खासदार नवनीत राणा यांचे खासगी सचिव विनोद गुहे यांनी येथील राजापेठ पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. गेल्या १६ ऑगस्टपासून विठ्ठलराव नावाची व्यक्ती नवनीत राणा यांच्या मोबाईलवर संपर्क साधून गर्दीच्या ठिकाणी मी कधीही धारदार चाकूने वार करणार, ते माहितीही पडणार नाही, अशा शब्दांमध्ये धमकी देत असून त्याने अश्लील शिवीगाळदेखील केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी राजापेठ पोलिसांनी आरोपीच्या विरोधात भादंवि ५०४, ५०६ (ब) कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. गेल्या वर्षीदेखील हनुमान चालिसा पठण केल्यास तुम्हाला ठार मारू, अशी धमकी नवनीत राणा यांना देण्यात आली होती. या प्रकरणी राणांनी नवी दिल्ली येथील नॉर्थ अव्हेन्यू पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. आता धमकीचा नवीन प्रकार समोर आला आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम