गड चढून जाण्याची हिंमत करतील का ; मिटकरींचा ठाकरेंना टोला !
दै. बातमीदार । २३ मार्च २०२३ । राज्यात गुढीपाडव्याच्या दिवशी मनसेचा शिवतीर्थावर मेळावा झाला या मेळाव्यात लाखो मनसे सैनिक होते. यावेळी यावेळी राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. तसेच महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरही त्यांनी भाष्य केलं. राजकीय नेत्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाचा विचका करू ठेवलाय, असं ते म्हणाले. याबरोबरच त्यांनी शिवराज्यभिषेक दिनाला म्हणजेच ६ जून रोजी रायगडावर जाणार असल्याचंही सांगितलं. दरम्यान, राज ठाकरेंच्या भाषणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी खोचक टीका केली आहे.
मनसेच्या मेळाव्यावर ट्वीट करताना मिटकरींनी राज ठाकरेंचा उल्लेख हास्यसम्राट असा केला. “धन्य ते हास्यसम्राट आणि धन्य त्यांची हास्यजत्रा..महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या प्रश्नांशी काही देणघेणे नसलेले हास्यसम्राट ६ जूनला रायगडावर जाणार असं समजलं, पण हे महाशय गड चढून जाण्याची हिंमत करतील का?” अशी खोचक टीका त्यांनी केली. तसेच गड चढायला मावळ्याचं काळीज असावं लागतं, कावळ्याची टीवटीव नव्हे, असं म्हणत त्यांनी राज ठाकरेंना डिवचलं.
दरम्यान, बुधवारी राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात महाराष्ट्रातील सत्तासंघर्षासह विविध राजकीय विषयांवर भाष्य केलं. यावेळी त्यांनी सत्ताधारी आणि विरोधकांवरदेखील तोफ डागली. शिवसेनेतील संघर्षावर बोलताना ते म्हणाले, “शिवसेना आणि धनुष्यबाण कोणाचा, हा विषय जेव्हा सुरू होता, त्यावेळी मला वेदना होत होत्या. कारण तो पक्ष मी जगलो आहे”. तसेच पुढे बोलताना त्यांनी ठाकरे गटाला इशाराही दिली. “काही गोष्टी तुमच्याशी बोलाव्या वाटल्या म्हणून मी बोलतोय. मला पुन्हा या गोष्टींचा चिखल करायचा नाही. घरातल्या गोष्टी बाहेरही काढायच्या नाहीत. मी आताच त्यांच्या बाजुच्या लोकांना (ठाकरे गट) सांगतो, माझं बोलणं झाल्यावर उद्या तोंड उचकटू नका. त्यानंतर माझ्या थोबाडातून जे बाहेर पडेल, ते तुम्हाला झेपायचं नाही”, असे ते म्हणाले.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम