योगी सरकारचा मोठा निर्णय : पाठ्यपुस्तकातून ते धडे होणार गायब !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ३ एप्रिल २०२३ ।  देशातील उत्तर प्रदेश सरकार नेहमी वेगवेगळे निर्णय घेत आहे. त्यात अजून एका मोठ्या निर्णयाची भर पडली आहे. उत्तर प्रदेशच्या योगी आदित्यनाथ यांनी नुकताच निर्णय घेवून त्याची अमलबजावणी सुद्धा व्हावी अशी घोषणा केली आहे. उत्तर प्रदेश बोर्ड आणि सीबीएसई बोर्ड यांचा अभ्यासक्रम योगी आदित्यनाथ सरकारने बदलला आहे.

योगी सरकारकडून दोन्ही बोर्डाचे अभ्यासक्रम बदलल्यामुळे आता बारावीच्या विद्यार्थ्यांना यापुढे मुघलांचा इतिहास शिकवला जाणार नाही. भारताचा इतिहास या पुस्तकातून मुघल दरबार हा विषय कमी करण्यात आला आहे. त्याच बरोबर ११ वीच्या पुस्तकातून इस्लामचा उदय, संस्कृतींमध्ये झालेले मतभेद, औद्योगिक क्रांती अशा प्रकारचे सर्वच धडे काढून टाकण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे. आगामी २०२३-२४ या वर्षापासून हा बदल करण्यात आला आहे. इतिहासाच्या पुस्तकासोबतच इतर विषयांमध्येही काही बदल करण्यात आले आहेत. याआधी बारावीच्या इतिहासाच्या पुस्तकात भारतीय इतिहासामध्ये शासक ते मुघल दरबार हे धडे होते. ही सगळी प्रकरणं आता वगळण्यात आली आहे. तर दुसरीकडे नागरिक शास्त्राच्या पुस्तकातून अमेरिकेचे वर्चस्व आणि शीतयुद्ध हे धडे काढून टाकण्यात आले आहेत.

या निर्णयानंतर उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री बृजेश पाठक यांनी सांगितलं की “आपली संस्कृती हा आपला सांस्कृतिक वारसा आहे. नव्या पिढीला आपण हा वारसा काय होता ते शिकवलं पाहिजे. पुरातन काळात लोक कोणत्या संस्कृतीत होते हा विषय शिकवलाच गेला नाही. त्यामुळे आम्ही मुघलांचा इतिहास वगळून त्याऐवजी हा विषय शिकवणार आहोत.” उत्तर प्रदेश सरकारने अकरावी आणि बारावीच्या पुस्तकांतून मुघलांचा इतिहास वगळण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता त्याबाबत समाजवादी पार्टीचे आमदार आणि माजी माध्यमिक शिक्षण मंत्री नवाब इकबाल मेहमुद यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “भाजपाचं सरकार मुस्लीम समाजाच्या विरोधात जे काही करता येईल ते सगळं करतं आहे. मात्र नुसतं इतिहासातून अभ्यासक्रम वगळून काय होणार? मुघल काळात भारताने खूप प्रगती केली होती हे कसं विसरता येईल? ” असे स्पष्ट मत यावेळी त्यांनी मांडले.

तसंच नवाब इकबाल मेहमुद म्हणाले की, “आता या सरकारने जी अभ्यासक्रमात सध्याची पुस्तकं आहे ती सगळी पुस्तकंही जप्त केली पाहिजेत. असं केलं तर मुघल शासकांचा इतिहास होता याचा पुरावाच नष्ट होईल. भाजपाकडून फक्त मतांच्या राजकारणासाठी या गोष्टी केल्या जात आहे. ताजमहाल, लाल किल्ला, कुतुबमिनार यांचा इतिहास फक्त भारतासाठीच मर्यादित नाही तर तो इतिहास सगळ्या जगाला माहित आहे. कारण सगळ्या जगातले पर्यटक ही ठिकाणं पाहण्यासाठी येत असतात. “असेही त्यांनी यावेळी म्हटले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम