
तुम्ही त्याच्या लेखणीवर कुणी बंदी घालू शकत नाही ; छगन भुजबळ
दै. बातमीदार । १४ डिसेंबर २०२२ । कोबाड गांधी लिखित ‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम’ या पुस्तकाचा लेखिका अनघा लेले यांनी मराठीत अनुवाद केलाय. या पुरस्काराला तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी पुरस्कार जाहीर झाला होता. पण नंतर राज्य सरकारनं तो पुरस्कार अचानकपणे रद्द केला.त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. साहित्य क्षेत्रातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. छगन भुजबळांनीही त्यावर भाष्य केलंय.
एखाद्या पुस्तकावर बंदी घालणं तुलनेनं सोपं असतं.पण त्या लेखकाच्या कल्पनाशक्तीवर आणि त्याच्या लेखणीवर कुणी बंदी घालू शकत नाही. कोबाड गांधी यांनी पुस्तकात काय लिहलं आहे, त्यांचा विचार काय आहे? हे कुणी वाचलं आहे का? ज्यांनी पुरस्कार नाकारला त्यांनी पुस्तक वाचले असेल. त्यात सरकार लक्ष घालेल, असं म्हणत राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी ‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम’ या पुस्तकावरून निर्माण झालेल्या वादावर प्रतिक्रिया दिली आहे.
त्याचसोबत विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही वादावर प्रतिक्रिया दिली आहे. सर्वच क्षेत्रात राजकीय हस्तक्षेप वाढत चालला आहे. साहित्य क्षेत्रातही सरकारचा हस्तक्षेप वाढतो आहे. सरकारने अशी ढवळाढवळ करू नये. ‘फ्रॅक्चर फ्रीडम’ पुस्तकासाठी जाहीर झालेला पुरस्कार रद्द करून सरकार अघोषित आणीबाणी तयार करत आहे, असं म्हणत अजित पवार यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. 17 डिसेंबरला महाविकास आघाडी मोर्चा काढणार आहे. राज्यातले प्रकल्प गुजरातमध्ये गेले. तरुणांचा रोजगार बुडाला आहे. महागाई, कर्नाटक सीमावाद अशा प्रश्नांवर आंदोलन करणार आहे, असंही भुजबळ यांनी सांगितलं आहे. मी बेळगाव, कारवारला गेलो होतोय. त्यावेळी 6-7 लोकांचे बळी गेले. सध्या कर्नाटक सरकारच्या चोराच्या उलट्या बोंबा सुरु आहेत. बेळगाव, कारवार राहिलं बाजूला आणि जत, अक्कलकोट मागायला लागलेत. हा आमचा भाग आहे. तो कदापिही कर्नाटकला मिळणार नाही,असं भुजबळ म्हणालेत.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम