सिक्कीमच्या ढगफुटीत १०२ जण बेपत्ता
बातमीदार | ६ ऑक्टोबर २०२३
गंगाटोक परिसरात ढगफुटीनंतर तीस्ता नदीला आलेल्या पूरसंकटातील मृतांचा आकडा १४ वर पोहोचला आहे. २२ सैनिकांसह १०२ जण अद्यापही बेपत्ता असून त्यांचा शोध घेण्यासाठी युद्धपातळीवर बचाव अभियान राबवले जात आहे. राज्याचे मुख्यमंत्री प्रेम सिंह तमांग यांनी सर्वाधिक पूरग्रस्त भागापैकी एक असलेल्या सिंगतमचा दौरा करत स्थितीचा आढावा घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही त्यांनी स्थितीबाबत कळवले असून मोदींनी राज्याला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले असल्याचे तमांग म्हणाले.
उत्तर सिक्कीममध्ये बुधवारी आलेल्या नैसर्गिक संकटातून आतापर्यंत २०११ लोकांना वाचविण्यात आले आहेतर २२ हजारहून अधिक लोकांना याचा फटका बसला आहे. बेपत्ता सैनिकांचा शोध घेण्यासाठी सखल भागावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. पूरग्रस्त चार जिल्ह्यांमध्ये २६ आश्रय शिबिरे स्थापन करण्यात आली आहेत. गंगटोकमधील ८ शिबिरांमध्ये एकूण १०२५ जणांनी आश्रय घेतला आहे. मुख्यमंत्री प्रेम सिंग तमांग यांनी पूरस्थितीचा आढावा घेत लोकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. सरकार सर्व प्रकारची मदत करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे ते म्हणाले. प्रशासन, स्थानिक अधिकारी, सर्व संघटना व लोकांना त्यांनी एकजुटीने संकटाचा सामना करण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले. मुख्यमंत्र्यांनी पत्राद्वारे मोदींकडे मदतीची मागणी केली असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. पुरामुळे फटका बसलेल्या चार जिल्ह्यांमध्ये २७७ हून अधिक घरांचे नुकसान झाले आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम