१९९६-९७ मधील इयत्ता दहावीचे माजी विद्यार्थीचे स्नेह संमेलन संपन्न
प्रतिनिधी । भडगाव
येथील सौ.सु.गि. पाटील माध्यमिक विद्यालयात सन १९९६-९७ मधील इयत्ता दहावीचे माजी विद्यार्थी तब्बल २६ वर्षानंतर आपल्याच शाळेत, आपल्याच वर्गात पुन्हा एकत्र जमले होते. दिवसाची सुरुवात परिपाठासह राष्ट्रगीताने झाली. वर्ग भरल्यानंतर मित्रमैत्रिणींनी आपल्या शालेय जीवनातील बालपणाच्या आठवणींना उजाळा दिला. आपल्या स्वतःच्या च बेंचवर पुन्हा बसून गप्पा गोष्टींमध्ये रमले. तसेच १० वी नंतर प्रत्येकाच्या आयुष्यात घडून गेलेल्या घटनांचा क्रम इतरांसमोर मांडला. मध्यंतरात गाणी, खेळ ,नृत्य यांचा आनंद घेतला.
स्नेहसंमेलन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून त्यावेळच्या शिक्षिका जयश्री पूर्णपात्री मॅडम , मीरा सैंदाने मॅडम, गणिताचे शिक्षक अरुण पाटील सर, छाया बिऱ्हाडे मॅडम, कलाशिक्षक सुरेश न्हावी सर, व्ही डी मोरे सर, पी बी गांगुर्डे सर हे उपस्थित होते. सर्व गुरुजनांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी सर्व उपस्थित विद्यार्थ्यांचेही स्वागत करण्यात आले. मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजी नगर, हैदराबाद, इंदोर,धुळे, जळगाव, चाळीसगाव येथे नोकरी व व्यवसायानिमित्त स्थायिक झालेले माजी विद्यार्थी व विद्यार्थिनी यांना आपल्या शाळेची लागलेली ओढ, मित्र भेटीची उत्सुकता सोशल मीडियाद्वारे तब्बल २६ वर्षानंतर पूर्ण झाली. याप्रसंगी अनेक विद्यार्थ्यांनी शाळेतील अनुभव कथन करून भावना व्यक्त केल्या.
व्यासपीठावर उपस्थित शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आपली मैत्री टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करण्यास सांगितले तसेच देशहित व मानवतेची भावना ठेवून आपण कार्य करावे, असे आवाहन केले. कुठलीही संकट आले तरी त्या संकटावर मात कशी करावी, याबाबत मार्गदर्शन केले.
रुपेश शिंपी यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी सर्व उपस्थित मित्र मैत्रिणींना सप्रेम भेट म्हणून आकर्षक भेटवस्तू देण्यात आली. मनोज पाटील यांनी सर्व मित्रमैत्रिणींना स्मृतिचिन्ह भेट म्हणून दिले. शेवटी सर्वांनी सुरुची भोजनाचा आस्वाद घेतला.
सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन रूपेश शिंपी यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मनोज पाटील,अमित महाजन,राकेश पाटील, प्रकाश महाजन, प्रशांत बडगुजर यांनी सहकार्य केले.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम