अजित पवार गटाकडून २० हजार खोटी प्रतिज्ञापत्रे : शरद पवार गटाचा आरोप !

बातमी शेअर करा...

बातमीदार | १० नोव्हेबर २०२३

राज्यातील शिवसेना पक्षाचा सुरु असलेल्या सत्तासंघर्षानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसमधील संघर्षाप्रकरणी केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुरू असलेल्या सुनावणीस गुरुवारी नवीन वळण लागले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाने आयोगासमोर तब्बल २० हजार खोटी प्रतिज्ञापत्रे सादर केली, असा आरोप शरद पवार गटातर्फे सुनावणीदरम्यान करण्यात आला.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ या निवडणूक चिन्हाच्या मुद्द्यावरून निवडणूक आयोगापुढे गुरुवारी जवळपास दीड तास सुनावणी झाली. शरद पवार गटाकडून दस्तुरखुद्द शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड सुनावणीस उपस्थित होते, तर अजित पवार गटाकडून खा. सुनील तटकरे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, माजी खासदार आनंद परांजपे उपस्थित होते. सुनावणीनंतर पत्रकारांशी बोलताना शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी सांगितले की राष्ट्रवादी काँग्रेसवर दावा करण्यासाठी अजित पवार गटाने आयोगापुढे तब्बल २० हजार खोटी प्रतिज्ञापत्रे सादर केली आहेत. यातील ८ हजार ९०० प्रतिज्ञापत्रांची यादी तयार करून ती निवडणूक आयोगाला सोपवण्यात आली असून, आयोगाने आपले म्हणणे मान्य केले असल्याचेही सिंघवी म्हणाले. सिंघवी म्हणाले की, खोट्या प्रतिज्ञापत्रांची जवळपास २४ प्रकारांत विभागणी करण्यात आली आहे. त्यात मृत्यू झालेले व्यक्ती, ज्यांचे पद अस्तित्वातच नाही अशा व्यक्ती, एवढेच नव्हे, तर गृहिणी आणि अगदी झोमॅटोचे विक्री व्यवस्थापक यांचाही समावेश आहे. आता या प्रकरणाची नियमित सुनावणी २० नोव्हेंबरपासून होणार आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम