ठाकरेंनी निवडणुकीसाठी कंबर कसली : गाफील राहू नका !

बातमी शेअर करा...

बातमीदार | १० नोव्हेबर २०२३

देशभरातील लोकसभेसाठी सर्वच पक्षांनी तयारी केली असून आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्रित होण्याची शक्यता आहे. या निवडणुका कधीही जाहीर होऊ शकतात. त्यामुळे गाफील न राहता कामाला लागा. निवडणुकीचे नियोजन करा, अशा सूचना शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना केल्या.
‘मातोश्री’ निवासस्थानी गुरुवारी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ठाकरे यांनी लोकसभा, विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेतला. खासदार संजय राऊत, विनायक राऊत, अनिल देसाई, अरविंद सावंत, चंद्रकांत खैरे, राजन विचारे, अनिल परब, रवींद्र वायकर आणि सुभाष देसाई आदी नेते यावेळी उपस्थित होते. शिवसेनेत फूट पडल्यानंतर मोठ्या संख्येने पदाधिकाऱ्यांनी ठाकरेंना सोडचिठ्ठी दिली.

नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेचे (ठाकरे) पॅनल शेवटच्या क्रमांकावर फेकले गेले. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंनी कंबर कसली आहे. पाच राज्यांतील निवडणुका संपल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोग कधीही आगामी लोकसभा निवडणुका जाहीर करू शकतो. या निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी ठाकरेंनी मातोश्रीवर तातडीची बैठक घेऊन आपल्या पक्षाच्या तयारीचा आढावा घेतला. तब्बल दोन तास चाललेल्या बैठकीत राज्यातील राजकीय परिस्थिती, मराठा आरक्षण आणि ग्रामपंचायत निकालावर चर्चा करण्यात आली. ठाकरेंनी यावेळी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना, लोकसभा निवडणुकीसाठी तातडीने कामाला लागा, गाफील राहू नका, असे आदेश दिले. शिवसेना (ठाकरे) सोडून गेलेल्या आमदार-खासदारांच्या मतदारसंघात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी तळ ठोकून शिवसेनेच्या बालेकिल्ल्यांवर पुन्हा लक्ष केंद्रित करा. फुटिरांना राजकीयदृष्ट्या गाडण्याचे स्थानिक पातळीवर नियोजन करा, अशा सूचना दिल्या.

शिवसेनेत फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी राज्यभरात मोर्चा, दौरे आणि सभा घेऊन वातावरण तापवले होते. मोठा जनसमुदाय ठाकरेंसोबत असल्याचे त्यांच्या प्रत्येक सभा, दौऱ्यातून दिसून येत होते. आता दिवाळीनंतर पुन्हा एकदा ठाकरे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत. शिवसेनेच्या (ठाकरे) पदाधिकाऱ्यांकडून महाराष्ट्रभर त्यांच्या सभा होतील, अशा स्वरूपात दौऱ्याचे नियोजन केले जाणार आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम