इस्रायलमधून बालकासह २१२ भारतीय मायदेशी परतले !

बातमी शेअर करा...

बातमीदार | १४ ऑक्टोबर २०२३

हमासच्या हल्ल्यानंतर सुरू झालेल्या युद्धसंघर्षामुळे इस्रायलमध्ये अडकलेल्या एका बालकासह २१२ भारतीय शुक्रवारी पहाटे मायदेशी पोहोचले. इस्रायलमधील भारतीयांची दुसरी तुकडीही येत्या काही तासांत रवाना केली जाईल, असे दूतावासाने सांगितले आहे.

‘ऑपरेशन अजय’ अंतर्गत केंद्र सरकारने पाठविलेले पहिले विशेष चार्टर्ड विमान या सर्वांसह दिल्ली विमानतळावर उतरले. विमानातून उतरताच या भारतीयांच्या चेहऱ्यावर सुटकेचा आनंद दिसून आला. अनेकांनी युद्धसंघर्षातील आपली आपबीतीही व्यक्त केली. इस्रायल व हमास यांच्यात युद्धाची ठिणगी पडल्यापासून दररोज थरकाप उडवणारे आवाज कानी पडत होते. हल्ले होण्याचा इशारा देणारा सायरन वाजला की आमची झोप उडत असे. मागील अनेक दिवस आम्ही तात्पुरत्या निवाऱ्यात गुजराण केली, असा भयावह अनुभव सांगताना अनेकांनी अश्रूंनाही वाट मोकळी करून दिली. या संकटात आम्ही ई-मेलद्वारे भारतीय दूतावासाच्या संपर्कात होतो, असे त्यांनी सांगितले. इस्रायलमध्ये १८ हजार भारतीय असून त्यापैकी इच्छुक भारतीयांना विशेष विमानांद्वारे मायदेशी आणले जात आहे. भारतीयांची दुसरी तुकडी आणण्यासाठी विमानाची व्यवस्था करण्यात आल्याचे भारतीय दूतावासाने स्पष्ट केले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम