
संपूर्ण मानव जातीच्या उद्धाराचा विचार विसावला
संपूर्ण मानव जातीच्या उद्धाराचा विचार विसावला
डॉ.अमरसिंह गौतम यांना बुलढाण्यात शोकसभेतून आदरांजली.
बुलढाणा प्रतिनिधी
संपूर्ण मानवजातीला सुखी, निरामय आनंदी जीवन जगता यावे व एकमेकांच्या सहकार्याने समूह विकासाची संकल्पना प्रत्यक्षात साकारली जावी यासाठी आयुष्यभर प्रयत्न करणारे सुप्रसिद्ध विचारवंत तथा होमीओ क्षेत्रातील सन्मानाचा जीवनगौरव पुरस्कार प्राप्त डॉ. अमरसिंग गौतम यांच्या निधनामुळे मानवजातीच्या उध्दाराचा साकल्याने विचार करणारे व्यक्तीमत्व हरवले, अशा भावना वैद्यकीय तज्ञांनी व विविध सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनी श्रध्दांजली सभेतून व्यक्त केल्या.
जेष्ठ होमिओतज्ञ तथा विचारवंत डॉ. अमरसिंग गौतम यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. डॉ. अमरसिंग गौतम यांना श्रद्धांजली समर्पित करण्यासाठी बुलढाणा होमिओपॅथिक असोसिएशन, होमिओ स्टडी सर्कल आणि इतर संघटनांच्या वतीने श्रद्धांजली सभेचे आयोजन १७ मे रोजी सकाळी येथील श्री. माऊली होमिओपॅथिक हाॅस्पीटल येथे करण्यात आले होते.
डॉ.अमरसिंह गौतम यांच्या प्रतिमेला पुष्पहार व पुष्प समर्पित करून उपस्थितांच्यावतीने सामूहिक श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावेळी होमिओपॅथिक असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.दुर्गासिंग जाधव, डॉ.सागर जोशी, डॉ.पवन बजाज, डॉ.ए .यु.शेख, डॉ. सौ स्वाती मसने, डॉ.सौ नीलिमा जाधव,डॉ.सौ लता बाहेकर, डॉ. सौ दिपाली बारोटे, डॉ. उमेश जाधव, डॉ.अभिजीत पाटील, डॉ. विनोद म्हसने, आझाद हिंद संघटनेचे संस्थापक अध्यक्ष ॲड सतीशचंद्र रोठे पाटील,विवेकानंद गुरुकुंज चे प्राचार्य गजानन इंगळे, श्री शिवाजी स्कूलचे पर्यवेक्षक गजेंद्रसिंह राजपूत, किशोर ठाकूर, पवन सोनारे,राजकुमार पंडितकर, विद्या विकास विद्यालय कोलवडचे शिक्षक भागवत धन्धर, विकी ठाकूर आदी मान्यवरांनी डॉ.गौतम यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकत त्यांना मनोगतातून भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित केली.
श्रद्धांजली सभेच्या शेवटी सामूहिक पसायदान घेण्यात आले
शोक सभेतून आठवणींना उजाळा.
डॉ.अमरसिंह गौतम हे होमिओपॅथी बरोबर मानवपॅथीचे चिकित्सक आणि गीतेचे गाढे अभ्यासक विचारवंत होते. एक महिन्यापूर्वी बुलढाणा शहरात १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने त्यांनी दिलेली भेट बुलढाणेकरांना आपलंसं करून गेली. होमिओपॅथी तज्ज्ञांसह विविध सामाजिक, धार्मिक क्षेत्रातील संघटनांनी त्यांचा सत्कार करत त्यांच्या मार्गदर्शन प्रबोधनाचे आयोजनही बुलढाण्यात करण्यात आले होते. मानवी मूल्यांचा होत असलेला ऱ्हास अनुषंगाने डॉ. गौतम यांनी व्यक्त केलेली चिंता संपूर्ण मानव जातीच्या कल्याणाची आणि उत्थानाची होती. संस्कृती आणि धर्माचे पालन यासह गीतेच्या तत्त्वज्ञानातून मानवी जीवनाचे तत्त्वज्ञान त्यांनी कृतीप्रवण केले. संपूर्ण मानव जातीच्या उत्थानासाठी मानवी कल्याणाच्या विचारांचे प्रबोधनही त्यांनी केले. बुलढाणा होमिओपॅथिक असोसिएशन च्या वतीने डॉ.अमरसिंह गौतम यांना दिलेला जीवनगौरव पुरस्कार मिळाल्यानंतर मन तृप्त झाले असून आता कोणत्याही पुरस्काराची आवश्यकता नाही, अशी मायेची कृतज्ञता व्यक्त करणारी प्रतिक्रिया त्यांनी दिली. होमिओपॅथीने मानवांची शारीरिक चिकित्सा केली तर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने सामाजिक अस्वास्थाची चिकित्सा केली, असे मत त्यावेळी डॉ.अमरसिंह गौतम यांनी व्यक्त केले होते. त्यांच्या निधनाने होमिओपॅथीसह संपूर्ण मानव जातीच्या सर्वांगीण संपन्नतेसाठी प्रयत्न करणाऱ्या मानवी तत्वज्ञानाला महाराष्ट्र मुकला आहे, अशा भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केल्या.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम