सर्व्हेत सत्ताधारी आघाडीला बसला मोठा फटका ; भाजपचे वाढले टेन्शन !
बातमीदार | २१ ऑगस्ट २०२३ | देशात आगामी काळात लोकसभेच्या निवडणुका होवू घातल्या असून आता केंद्रातील सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) देशाची सूत्रे आपल्या हाती कायम ठेवण्यासाठी व्युहरचना आखण्यास सुरुवात केली आहे. पण टाइम्स नाउ ईटीजीच्या एका सर्व्हेत केंद्रातील या सत्ताधारी आघाडीला जबर धक्का बसणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
या सर्व्हेत जवळपास 60 टक्के लोकांचे फोनवरुन, तर 40 टक्के लोकांचे घरोघरी जाऊन मते जाणून घेण्यात आली. त्यात गत लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत यावेळी NDA ला महाराष्ट्रासह बिहार, राजस्थान, मध्य प्रदेश, झारखंड व पश्चिम बंगाल या 6 राज्यांमध्ये प्रचंड नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
या 6 पैकी मध्य प्रदेश व महाराष्ट्र या 2 राज्यांत NDA ची सत्ता आहे. तर उर्वरित राजस्थान, झारखंड, बिहार व पश्चिम बंगाल या 4 राज्यांत विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीचे सरकार आहे. विशेष म्हणजे या सर्वेक्षणात विरोधी पक्षांनाही फारसा फायदा होताना दिसून आले नाही.
या 6 राज्यांमध्ये लोकसभेच्या एकूण 198 जागा आहेत. 2019 मध्ये 163 जागांवर लढत झाली आणि NDA जिंकली. ताज्या सर्वेक्षणाच्या निष्कर्षानुसार, या राज्यांत NDA चा 120 ते 134 जागांवर विजय होऊ शकतो. तर 29 ते 43 जागांचे नुकसान सोसावे लागू शकते. सर्वेक्षणानुसार, NDA ला राजस्थानमध्ये 20 ते 22, मध्य प्रदेशात 24 ते 26, महाराष्ट्रात 1 ते 2, बिहारमध्ये 22 ते 24, पश्चिम बंगालमध्ये 16 ते 18 व झारखंडमध्ये 10 ते 12 जागा मिळण्याचा अंदाज आहे.
दुसरीकडे, या सर्वेक्षणानुसार विरोधकांच्या इंडिया आघाडीला राजस्थानात 2 ते 3, मध्य प्रदेशात 3 ते 5, महाराष्ट्रात 15 ते 19, बिहारमध्ये 16 ते 18, पश्चिम बंगालमध्ये 23 ते 27 व झारखंडमध्ये 2 ते 4 जागा मिळण्याची शक्यता आहे. इतर जागा कोणत्या पक्षाला किंवा गटाला मिळणार हे यात नमूद करण्यात आले नाही.
2019 च्या लोकसभा निवडणुकीवेळी मध्य प्रदेशात काँग्रेसचे सरकार होते. त्यावेळी राज्यातील 29 पैकी 28 जागा एनडीएने जिंकल्या होत्या. त्याचवेळी महाराष्ट्रात भाजपची शिवसेनेसोबत युती होती. त्यात एनडीएने 48 पैकी 41 जागा जिंकल्या होत्या. याशिवाय बिहारमध्ये 40 पैकी 39, झारखंडमध्ये 14 पैकी 12, राजस्थानमध्ये 25 पैकी 25 व पश्चिम बंगालमध्ये 42 पैकी 18 जागा NDA ने जिंकल्या होत्या. ताज्या सर्व्हेक्षणामुळे आगामी सार्वत्रिक निवडणुकीत एनडीएचा विजय होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. पण त्याचवेळी त्यांच्या जागा काहीअंशी घटण्याचाही इशारा देण्यात आला आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम