महाविकास आघाडीला वेगळे वळण ; अजित पवार व संजय राऊतांमध्ये जुंपली !
दै. बातमीदार । १९ एप्रिल २०२३ । दोन दिवसापासून विरोधी पक्षनेते अजित पवार भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा राज्यभर होवू लागल्या होत्या. यावर अजित पवार यांनी मिडीयामध्ये येत खुलासा करीत ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्यावर निशाना साधला होता आता त्यावर संजय राऊत यांनी अजित पवारांना सुनावले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात महाविकास आघाडीमधील वाद उफाळून येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
शिवसेना फुटली तेव्हा तुम्ही आमची वकिली करत होतात. आता मी मविआची वकिली केली म्हणून माझ्यावर खापर का फोडत आहात?, असा सवाल ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांना केला आहे.
तसेच, अजितदादांनीच भाजपचा काय डाव आहे?, हे स्पष्ट करुन सांगावे, असे आवाहनही संजय राऊत यांनी केली. इतर पक्षाच्या प्रवक्त्याने राष्ट्रवादी काँग्रेसची वकिली करू नये, अशा शब्दांत काल अजित पवारांनी संजय राऊतांबद्दल नाराजी व्यक्त केली होती. त्याला आज पत्रकार परिषदेत संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिले. संजय राऊत म्हणाले, मी मविआचा चौकीदार आहे. महाविकास आघाडीतील प्रत्येक घटक पक्ष मजबूत रहावा, ही आमची इच्छा आहे. त्यावर आमच्याच घटक पक्षाचे नेते खापर फोडत असतील तर गंमत आहे.
संजय राऊत म्हणाले, महाराष्ट्रात विरोधकांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे. विरोधी पक्षातील नेत्यांवर ईडीची धाड टाकून त्यांच्यावर भाजपमध्ये येण्याचा दबाव टाकला जात आहे. हसन मुश्रीफ, जितेंद्र आव्हाड यांच्यासारखी कितीतरी उदाहरणे मी देऊ शकतो. महाराष्ट्रात असे घडते आहे की नाही, हे स्वत: अजित पवारांनी सांगण्याची आता गरज आहे. संजय राऊत म्हणाले, सामनाच्या रोखठोक सदरात मी चुकीचे काहीही बोललेलो नाही. स्वत: शरद पवार हेच विरोधी पक्षातील आमदारांवर दबाव टाकला जात असल्याचे म्हणत आहेत. त्यांनी स्वत: ईडीच्या गैरवापराबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र दिले आहे. तेच मी सामनामध्ये लिहिले तर चुकीचे काय? तसेच, मी यापुढेही लिहित राहणार, बोलत राहणार, कोणाला टोचत असेल तर मी काय करू?
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम