बातमीदार | ८ ऑक्टोबर २०२३
आपण नेहमीच आपली प्रकुती उत्तम राहण्यासाठी अनेक घरगुती उपाय करीत असतो. त्यात आंबटगोड, तुरट चव असणारा कवठ वात, पित्त आणि कफ संतुलन करतो. दक्षिण हिंदुस्थानात सर्वत्र आढळून येणारा कवठ वृक्ष सध्या दुर्मिळ होत आहे. कवठाचे वैज्ञानिक नाव फेरोनिया एलेफंटम लिमोनिया आहे.
याला मंकी फ्रूट, कपित्थ, दधिफल, कपिप्रिय, कवठ, कवंठी अशी विविध नावे आहेत. हा काटेरी आणि पानझडी प्रकारचा वृक्ष आहे. या झाडाची उंची 6-9 मी. असते. याची पाने संयुक्त, विषमदली, पिसासारखी एकाआड एक, चकचकीत व गुळगुळीत असतात. झाडाच्या खोडाची साल पांढरट-हिरवी किंवा काळी, खरबरीत, जाड व भेगाळलेली असते. फेब्रुवारी ते एप्रिल या काळात या झाडांच्या फांद्यांच्या टोकास विरळ परिमंजरीवर लहान आकाराची फिकट लाल व आखूड देठांची फुले येतात. मोहर आल्यानंतर साधारणत: दोन-तीन महिन्यांनी फळे तयार होतात. या फळांची साल कठीण असते. या फळांचा रंग हा करडा असतो. आतमध्ये मृदू गर व लांबट बिया असतात. कवठाचे पिकलेले फळ चवीला आंबट-गोड व तुरट असते.
कवठाच्या गरापासून खाण्यासाठी चटणी, मुरंबा, जेली, बर्फी बनवतात. हे फळ पित्ताचे शमन करण्यास मदत करते व यामुळे भूक वाढते. कवठ कंठाची शुद्धी करते. दमा, क्षयरोग, रक्तविकार, उलटी, वातदोष, श्रम, उचकी, विष, तृष्णा, ग्लानी वगैरे पारीत हितकर असते. वात, पित्त आणि कफ या तिन्ही दोषांचे संतुलन करते. फळाची साल पित्तावर उपयुक्त असते तसेच ती कातडी कमावण्यासाठी व रंगविण्यासाठी वापरतात. वाळलेली फुले उकळून त्यापासून रंग मिळतो. या झाडापासून डिंकही मिळतो. हा डिंक अर्धपारदर्शक, तांबूस भुरा असतो. बाभळीच्या डिंकास पर्याय म्हणून मोठय़ा प्रमाणात वापर केला जातो. या झाडापासून मिळणारे लाकूड मजबूत आणि टिकाऊ स्वरूपाचे असल्यामुळे घरबांधणीसाठी व शेतीची अवजारे बनवण्यासाठी उपयोग केला जातो.
कवठामुळे दृष्टी क्षीण होत नाही. कवठामध्ये व्हिटामिन सीसुद्धा चांगल्या प्रमाणात उपलब्ध असते. कवठाच्या बियांमध्ये प्रथिने जास्त प्रमाणात असतात. कवठाची पाने ही वातशामक आहेत. कवठाच्या पानांमध्ये भरपूर पोषक द्रव्ये असतात. तसेच ‘बी’ जीवनसत्त्वे आणि फायबर्स असतात. त्यामुळे या पानांचे सेवन शरीरासाठी फायदेशीर ठरते. अन्य पालेभाज्यांप्रमाणे कवठाच्या पानाची भाजी बनवली जाते.
मगज स्तंभक, उत्तेजक व दीपक असून पोटाच्या पारींवर गुणकारी आहे. याची चटणी, बर्फी, मुरंबा व सरबत करतात. विषारी कीटकदंशावर बाहेरून लेप लावतात. फळाची साल पित्तावर उपयुक्त असते तसेच ती कातडी कमावण्यासाठी व रंगविण्यासाठी वापरतात. वाळलेली फुले उकळून त्यांपासून रंग मिळतो.
कच्च्या कवठाचा उपयोग अतिसार आणि जुलाब बंद होण्यासाठी केला जातो. अजीर्णासाठी कवठाचे चूर्ण वापरले जाते. पाला व फळ पित्तशामक आहे. जुलाब लागल्यास किंवा उलटय़ा व मळमळ होत असल्यास कवठ खाल्ल्याने आराम मिळतो.कवठ हे वाईट कालेस्टेरॉल कमी करते तसेच यामुळे रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होत असल्याने हृदयाच्या आरोग्यासाठी हे फळ चांगले असते. जास्त प्रमाणात कवठ खाल्ल्यास पोटात दुखते, गॅस, अपचन, अॅसिडिटी होते. कवठाचा गर, दालचिनी, काळी मिरी व मीठ एकत्र करून सरबत करतात. कवठाचा पाला शेळ्या-मेंढय़ांचे खाद्य म्हणून वापरतात.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम