आ.खड्सेंचे मंत्री महाजनांना आव्हान : तर चौकात जोडे मारणार !
बातमीदार | २४ नोव्हेबर २०२३
जळगाव जिल्ह्यातील दोन दिग्गज नेत्यामध्ये आता राजकारण तापले आहे. बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात मंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकारांशी बोलताना खडसेंच्या आजारपणाला ‘सोंग’ म्हटले होते. अवैध गौण खनिजाच्या उत्खननप्रकरणी १३७ कोटींच्या दंडाची नोटीस बजावल्याने खडसेंनी सहानुभूती मिळविण्यासाठी हे सोंग केल्याचा दावाही महाजन यांनी केला होता. त्यावर आता आ.खडसे यांनी त्यांना प्रतिउत्तर दिले आहे.
मंत्री गिरीश महाजन यांनी वैद्यकीय शिक्षण खात्याचाही कारभार सांभाळला आहे. त्यामुळे माझ्या आजारपणाला ‘सोंग’ म्हणणाऱ्या महाजन यांनी उपचाराच्या कागदपत्रांची खात्री करावी. ते खोटे निघाल्यास भरचौकात जोडे खायला तयार आहे. मात्र ते खरे निघाल्यास महाजन यांनीही जोडे खायला तयार राहावे, असे आव्हान आमदार एकनाथ खडसे यांनी गुरुवारी दिले.
गुरुवारी खडसेंनी महाजन यांच्या टीकेला उत्तर दिले. मराठा, धनगर, कोळी समाजाच्या मागण्यांसंदर्भात सरकारच्या वतीने महाजन यांनी ‘संकटमोचक’ म्हणून उपोषण, आंदोलनाला भेट देऊन चर्चा केली. आता या तीनही समाजाच्या मागण्यांबाबत त्यांनी काय केलं, याचे उत्तर द्यावे, असेही खडसेंनी स्पष्ट केले. माझे हृदय बंद पडले होते. पण सुदैवाने जनतेच्या आणि मुक्ताईच्या आशीर्वादाने मी सुखरूप परतलो आहे. त्यामुळे यमुनेच्या तीरावर बसून महाजन यांनी बेछूट आरोप करू नयेत, असेही खडसे म्हणाले.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम