दै. बातमीदार । १६ ऑक्टोबर २०२२ । राज्यात सर्व सुखी समाधानाने शिवसेनेत सुरु असताना आमच्यात आणि उद्धव ठाकरे यांच्या जी दरी पडली, त्यामध्ये शिवसेनेतील दोन राऊतांचा मोठा वाटा आहे. तसेच, आणखी दोघे-तिघे यासाठी कारणीभूत आहे, असे सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी म्हटले आहे.
शिवसेनेतील बंडानंतर शहाजीबापू सातत्याने शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर सडकून टीका केली आहे. मात्र, आता संजय राऊत यांच्यासोबतच खासदार विनायक राऊत यांनाही शहाजीबापूंनी लक्ष्य केले आहे. शहाजीबापू म्हणाले, उद्धव ठाकरे आणि आमच्यात खासदार संजय राऊत आणि खासदार विनायक राऊत यांच्यामुळे दरी पडली. यापैकी संजय राऊत आता तुरुंगात आहेत. तर, विनायक राऊत यांचा निवडणुकीत पराभव करेल, असा इशारा शहाजीबापूंनी दिला. या दोन राऊतांनी आमचं वाटोळं केलं, असे शहाजीबापू म्हणाले.
अंधेरी पोटनिवडणुकीवरून शिंदे गट, भाजप यांच्याविरोधात ठाकरे गट उभा ठाकला आहे. या पोटनिवडणुकीत मुरजी पटेल यांचाच विजय होईल, असा विश्वासही शहाजीबापू यांनी व्यक्त केला. ते म्हणाले, मुरजी पटेल यांनी अंधेरी पोटनिवडणुकीसाठी मागील तीन महिने काम केले. गेल्या निवडणुकीतही त्यांना चांगली मते पडली होती. त्यामुळे या जागेवर भाजपचे उमेदवार म्हणून मुरजी पटेल यांना संधी देण्यात आली. ही जागा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच भाजपला सोडली. मनसेप्रमुख राज ठाकरे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नुकतीच वर्षा बंगल्यावर भेट झाली. त्यावर प्रतिक्रिया देताना शहाजीबापू म्हणाले, राज्याच्या हितासाठी शिंदे गट, भाजपसोबत मनसेची युती निश्चितपणे व्हावी. येत्या काळात 100 टक्के अशी युती होऊ शकते.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम