आंदोलनात बसलेल्या तरुणाने संपवलं जीवन !
बातमीदार | १८ सप्टेंबर २०२३
राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून मराठा आंदोलक आंदोलन करत आहे. आमच्या मागण्या तातडीने मान्य करा, अशी मागणी आंदोलक राज्य सरकारकडे करीत आहेत. अशातच नांदेड जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नांदेडमध्ये मराठा आंदोलनासाठी बसलेल्या तरुणाने आपली जीवनयात्रा संपवली आहे.
हिमायतनगर तालुक्यातील कामारी गावात रविवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. सुदर्शन देवराये असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे. समाजाला आरक्षण मिळावे या हेतूने सुदर्शनने आत्महत्या केली आहे, असा दावा कामारी गावातील गावकऱ्यांनी केला आहे. दरम्यान या घटनेनंतर कामारी गावातील मराठा आंदोलनाच फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाले आहेत. याशिवाय सुदर्शन देवराये याचेही फोटो व्हायरल होत आहे. अनेकांनी या घटनेवर दु:ख व्यक्त केलं असून राज्य सरकारविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी हिमायतनगर तालुक्यातील कामारी गावात काही मराठा तरुण आंदोलन करीत आहेत.
या आंदोलनात सहभागी असलेल्या सुदर्शन देवराये याने रविवारी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. काही दिवसांपूर्वी मराठा आरक्षणाच्या मागणीत कायम अग्रेसर असणाऱ्या बीड जिल्ह्यातील नायगाव (ता. पाटोदा) येथील एका व्यक्तीने गळफास लाऊन आत्महत्या केली होती. गोविंद गोपीचंद औटे (वय – ४२) असे आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव होते. आरक्षणासाठी आयोजित चक्काजाम आंदोलनाच्या धामधुमीवेळीच गोविंद यांनी गळफास घेतला होता.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम