अभिनेता विजय देवरकोंडाने घेतला मोठा निर्णय !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १६ नोव्हेबर २०२२ सुपरस्टार अभिनेत्यामध्ये दाक्षिणात्य सुपरस्टार म्हणून ओळख असलेले विजय देवरकोंडाने काही दिवसांपूर्वीच बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. ‘लायगर’ या चित्रपटात त्याने अनन्या पांडेसोबत भूमिका साकारली. मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपेक्षित कामगिरी करू शकला नाही. त्यानंतर आता विजय एका विशेष कारणामुळे चर्चेत आला आहे. विजयने नुकताच अवयवदानाला प्रोत्साहन देणाऱ्या एका कार्यक्रमात सहभाग घेतला. या कार्यक्रमात तो अवयवदान या मुद्द्यावर मोकळेपणे बोलला. इतकंच नव्हे तर त्याने स्वत: अवयवदान करण्याचं जाहीर केलं.

“डॉक्टरांनी मला सांगितलं की बऱ्याचशा शस्त्रक्रिया या डोनरमुळेच यशस्वी ठरतात. या गोष्टीवर विश्वास ठेवणं जरा कठीण आहे पण बरेच लोक इतरांसाठी स्वत:चं अवयवदान करत आहेत. ही सर्वांत सुंदर गोष्ट आहे”, असं तो म्हणाला. “मी लवकरच अवयवदानाची प्रक्रिया सुरू करणार आहे. माझ्या निधनानंतर ते जर इतरांच्या कामी आले तर मला त्याचा खूप आनंद होईल. मी स्वत: फीट आहे आणि माझ्या आरोग्याची योग्य काळजी घेतो. माझ्या आईने अवयवदानासाठी नोंदणी केली आहे”, असं विजयने सांगितलं. विजयने त्याच्या चाहत्यांनाही अवयवदान करण्याचं आवाहन केलं आहे. विजयच्या या निर्णयाचं चाहत्यांकडून खूप कौतुक होत आहे. ‘विजयचं मन खूप मोठं आहे. अवयवदान करणं ही काही छोटी बाब नाही’, असं एका चाहत्याने लिहिलं. तर ‘तुझ्यासाठी असलेलं प्रेम आणि आदर आणखी वाढला आहे’, असं दुसऱ्या युजरने म्हटलं. विजय देवरकोंडाच्या आधी बऱ्याच सेलिब्रिटींनी अवयवदानाचा निर्णय घेतला आहे. यामध्ये अमिताभ बच्चन, प्रियांका चोप्रा, सलमान खान, आमिर खान, आर. माधवन, सुनील शेट्टी, राणी मुखर्जी यांचा समावेश आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम