दै. बातमीदार । २२ जानेवारी २०२३ । देशात सध्या बागेश्वर धाम सरकार खूप सोशल मिडीयावर चर्चेत आहे. याचा प्रत्यय सुद्धा काही पत्रकारांनी घेतला आहे. अंधश्रद्धा निर्मुलन समितीने दिलेल्या आव्हानामुळे बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री चर्चेत आलेत. नागपूरच्या घटनेवर स्पष्टीकरण देताना शास्त्रींनी आपल्या आसामान्य शक्तींवर भाष्य केले. एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना ते म्हणाले – ‘मी कोणताही तपस्वी किंवा माइंड रीडर नाही. मी गादीवर बसलेला नसतो, तेव्हा एक सामान्य माणूस असतो. पण गादीवर बसून भगवान बालाजी व हनुमानाचे स्मरण केल्यानंतर जे आदेश मिळतात, तेच मी कागदावर लिहितो. लोक माझ्याकडे याचना घेऊन येतात. त्यानंतर मी माझ्या गुरूंकडून प्रेरणा घेऊन त्या याचनेवर लेखी भाष्य करतो. ते कागदावर लिहितो.’
यासंबंधीच्या माहितीनुसार, बागेश्वर बाबा आपल्या कथित दिव्य दरबारात नागरिकांच्या समस्या ऐकतात. विशेषतः त्यांच्या मनातील गोष्ट सांगण्यापूर्वीच ते त्या समस्या एका कागदावर लिहिल्याचा दावा करतात. ते या समस्येवर उपायही सांगतात. यामुळे त्यांचे समर्थक ते एक सिद्ध पुरुष असल्याचा दावा करतात. बागेश्वर धाम सरकारची कथा सध्या छत्तीसगडच्या रायपूरमध्ये सुरू आहे. तिथे त्यांनी आपला दरबार लावला आहे.
बागेश्वर महाराज यांनी आपण संत किंवा तपस्वी नसल्याचे स्पष्ट केले आहे. ते म्हणाले – ‘मी कोणताही अंतर्यामी नाही. मी केवळ माझ्या ईष्ट देवांचा साधक आहे. माझ्याकडे लोक समस्या घेऊन येतात. मी केव्हाच जादूगर असल्याचा दावा केला नाही. मी माणूस असल्यामुळे कुणासोबत भेदभावही करत नाही. मी केवळ लोकांच्या अर्जावर भाष्य करतो. त्याचे निर्देश मला माझ्या गुरूकडू मिळतात. त्यांनी सांगितलेली माहितीच मी कागदावर लिहितो. त्यानंतर लोकच श्रद्धेने हीच आमची समस्या असल्याचे मान्य करतात. मी कागदावर लिहिलेली गोष्ट खरी आहे की खोटी हे मी नव्हे तर तेच सांगतात.’
बागेश्वर महाराज म्हणाले की, ‘माझ्याविरोधात कट कारस्थन रचले जाण्याची शक्यता मी यापूर्वीच व्यक्त केली होती. मी धर्मांतराविरोधात अभियान सुरू करण्याचा निर्णय घेतला, तेव्हापासून हे कारस्थान सुरू आहे. माझ्या दरबारात अनेकजण भूत-प्रेताची समस्या घेऊन येतात. मी भोळ्याभाबड्या लोकांना सनातन धर्माच्या मंत्रोच्चारात ही भूतबाधा पळवण्याची ताकद असल्याचे सांगतो. पण यासाठी त्यांनी घरवापसी करण्याची गरज आहे असेही स्पष्ट करतो.’
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम