बातमीदार | ७ सप्टेंबर २०२३ | राज्यातील जालना जिल्ह्यात सुरु असलेले मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरु असतांना आता धाराशिव जिल्ह्यातील माडज येथील किसन माने (३०) या तरुणाने बुधवारी सायंकाळी गावातील शिवकालीन वैजनाथ महाराज तलावात उडी घेऊन आत्महत्या केली. दरम्यान, या घटनेची वार्ता वाऱ्यासारखी पसरल्यानंतर माडज गावासह तालुक्यातील अन्य गावांतील लोकांचा जमाव वाढल्याने तणाव निर्माण झाला. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे.
या घटनेनंतर मराठा तरुणांनी उमरगा बंदची हाक दिली आहे. तसेच आत्महत्या करणाऱ्या तरुणाचा मृतदेह तहसील कार्यायलयासमोर ठेवण्यात आला. जो पर्यंत आरक्षण मिळत नाही, तो पर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका आंदोलकांनी घेतली होती. तहसील परिसरात मराठा समाजाचे आंदोलक मोठ्या संख्येने जमा झाले होते. त्यामुळे काही वेळ तणाव निर्माण झाला होता. यावेळी आंदोलकांनी एक कार पेटवून दिली. त्यामुळे पोलिस प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली. या आंदोलकांना चर्चेअंती शांत करण्यात आले. त्यानंतर मृतदेह घेऊन ते तरुणाची गावी माडजला अंत्यसंस्कारासाठी रवाना झाले. दरम्यान अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम