औरंगाबादेत ठाकरे गटाचे आंदोलन ; विरोधी पक्षनेते दानवे पोलिसांच्या ताब्यात !
दै. बातमीदार । १ डिसेंबर २०२२ । शिवसेनेचे आंदोलन म्हटले कि चांगले चांगले धक्का घेत असतात, शिवसेनेच्या आंदोलन चर्चा हि राज्यभरात होत असते, शेतकऱ्यांना करण्यात आलेली वीजबिलाची सक्ती व पीक विमा कंपन्यांविरोधात ठाकरे गटाने औरंगाबादेत ठिकठिकाणी चक्काजाम आंदोलन पुकारले आहे. आंदोलनादरम्यान विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
औरंगाबाद-नगर रोडवर ईसारवाडी फाट्याजवळ अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली सकाळी 10 वाजेपासून चक्का जाम आंदोलन पुकारण्यात आले होते. ठाकरे गटाच्या कार्यकर्ते मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले. पुण्याकडे जाणारा हा महत्त्वाचा रस्ता असल्याने आंदोलनामुळे येथे मोठी वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी हस्तक्षेप करत अंबादास दानवेंची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, अंबादास दानवे आंदोलनावर ठाम होते. त्यामुळे अखेर पोलिसांनी अंबादास दानवेंसह कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
यावेळी अंबादास दानवे म्हणाले की, यंदा पाऊस चांगला झाल्यामुळे शेतकऱ्यांना रब्बी पीक चांगले येण्याची अपेक्षा आहे. मात्र, वीजबिल सक्तीच्या नावाखाली शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कट केले जात आहे. त्यामुळे एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचेही समोर आले आहे. या स्थितीकडे सरकारने उघड्या डोळ्यांनी पहावे, यासाठी आम्हाला रस्त्यावर उतरावे लागले आहे. अंबादास दानवे म्हणाले की, सरकार शेतकऱ्यांसाठी असल्याचे म्हटले जाते. मात्र, सध्या केवळ पीक विमा कंपन्यांची दादागिरी सुरू आहे. सरकारने वेळीच यात सुधारणा न केल्यास आंदोलनाच्या पुढचे पाऊल उचलू, असा इशाराही अंबादास दानवेंनी दिला.
याशिवाय औरंगाबाद-मनमाड रस्त्यावर चंद्रकांत खैरे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू आहे. यावेळी चंद्रकांत खैरे म्हणाले की, कृषिमंत्री केवळ आपल्या मर्जीतला कृषि आयुक्त कसा येईल, याकडे लक्ष देत आहेत. हे सरकार केवळ खोके घेण्यात व्यस्त आहे. मात्र, शेतकऱ्यांना काहीही मदत केली जात नाही. ऐन रब्बी हंगामात त्यांचे वीज कनेक्शन कट केले जात आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम