अजित पवारांसह सर्वच आमदार शरद पवारांच्या भेटीला !
दै. बातमीदार । १६ जुलै २०२३ । राज्यातील राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्या सोबत सत्तेत भागीदार झाले आहे. यानंतर अजित पवार यांनी सर्व मंत्र्यांसह शरद पवार यांची भेट घेतली. शरद पवार यांची वेळ न घेता संधी साधत अजित पवार गटाने त्यांची वायबी चव्हाण सेंटरवर भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. मात्र, अजितदादा गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवार हे आमचे दैवत आहे, त्यांचे पायपडून आशीर्वाद घेतले असे म्हटले आहे. दरम्यान राष्ट्रवादी एकसंध राहावी यासाठी आम्ही शरद पवारांना विनंती केली असून त्यांवर त्यांनी काही प्रतिक्रिया दिली नाही असे ही यावेळी पटेल यांनी म्हटले आहे. आता शरद पवार काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पावसाळी अधिवेशनाआधी अजित पवार गटाच्या मंत्र्याची बैठक पार पडली. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या देवगिरी निवासस्थानी ही बैठक पार पडली. या बैठकीनंतर शरद पवार यांना भेटण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, आदिती तटकरे, मंत्री दिलीप वळसे पाटील, मंत्री हसन मुश्रीफ, छगन भुजबळ वाय. बी. चव्हाण सेंटरला पोहचले. अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल म्हणाले की, आज शरद पवार यांचे आशीर्वाद घेण्यासाठी अजित पवार यांच्यासह सर्व मंत्री वाय.बी. चव्हाण सेंटरला संधी साधून वेळ न मागता आलो होतो. यावेळी आम्ही त्यांचे आशीर्वाद घेतले असून सर्वांनी त्यांना विनंती केली आहे की, राष्ट्रवादी काँग्रेस एकसंध राहावा यासाठी मार्गदर्शन करायला हवे. मात्र, शरद पवार यांनी यावर काहीच प्रतिक्रिया दिली नाही. राज्याचे पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे. मात्र, अद्याप विरोधी पक्षनेता कोण? यावर मविआतील घटकपक्षांचे एकमत झाल्याचे दिसत नाही. काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनीच याबाबत माहिती दिली आहे की, अजूनतरी विरोधी पक्षनेतेपदाबाबत काहीही चर्चा झालेली नाही. तसेच, आपण विरोधी पक्षनेतेपद स्वीकारणार का? असा प्रश्न पत्रकारांनी केला असता पक्ष घेईल तो निर्णय आम्हाला मान्य असेल असे सूचक वक्तव्य अशोक चव्हाण यांनी केले.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम