अजित पवारांचा संताप : थोडी माणुसकी राहुद्या !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १ एप्रिल २०२३ । गेल्या तीन दिवसांपूर्वी पुण्यामधील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात भाजपचे खासदार गिरीश बापट यांचं निधन झालं. त्यांच्या अकाली निधनामुळे पुणे लोकसभा मतदारसंघाची जागा आता रिक्त झाली आहे. त्यामुळे येत्या सहा महिन्यात या रिक्त जागेवर पोटनिवडणूक होणार आहे. यावरून बॅनरबाजी देखील सुरू झाली आहे. यावर आज विरोधी पक्षनेते अजित पवार आक्रमक झाल्याचे दिसून आले आहे.

गिरीश बापट यांना जाऊन अवघे तीन दिवस उलटले नाही तोच या जागेवर इच्छुकांनी दावा सांगण्यास सुरुवात झाली आहे. भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या कार्यकर्त्यांनी पुण्यात बॅनर लावले आहे. त्यावर जगदीश मुळीक यांचा भावी खासदार असा उल्लेख करण्यात आला आहे. यावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी संतापजनक प्रतिक्रिया दिली आहे.

अजित पवार म्हणाले, मी काल गिरीश बापट यांच्या पत्नीला मुलाला, सुनेला भेटायला गेलो होतो. बापट त्यांच्या अस्थिचे देखील विसर्जन झाले नाही. थोडी माणुसकी राहुद्या, गुडघ्याला बाशिंग बांधायचे काही कारण नाही. १३ ते १४ दिवस दुखवटा पाळण्याची आपल्यात पद्धत आहे. सगळ्यांची त्याचे तारतम्य ठेवले पाहिजे. विरोधी आणि सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी देखील हे लक्ष ठेवावे.

एवढी घाई कशाची आहे? गिरीश बापट यांच्या निधनाला तीन दिवस झाले आहेत. माणुसकी देखील एक गोष्ट आहे. महाराष्ट्राला सभ्य राजकीय परंपरा आहे. आतापासूनच निवडणुकीबद्दल बोलायला लागलो तर लोक आमच्याबद्दल काय विचार करतील, असे अजित पवार म्हणाले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम