अजित पवारांचे मंत्री अडचणीत ; अवमानकारक वक्तव्याप्रकरणी नोटीस !
बातमीदार | १७ ऑक्टोबर २०२३
राज्यात गेल्या काही महिन्यापासून आरक्षणावरून मोठे राजकारण तापले आहे. यात आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कारण, मराठा समाजाबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याबद्दल मंत्री छगन भुजबळ यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड शहराचे संभाजी ब्रिगेड अध्यक्ष सतीश काळे यांनी वकिलांमार्फत ही नोटीस बजावली आहे.
मुंबई येथे एका मेळाव्यात भावना दुखावणारी केलेली वक्तव्ये तत्काळ मागे घेऊन मराठा समाजाची माफी मागावी, अन्यथा कायदेशीर कारवाई करू, असे या नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे. मराठा आरक्षणाची मागणी जातीच्या किंवा व्यक्तीविरुद्ध नाही, असे असताना देखील भुजबळ दोन समाजांत तेढ निर्माण होईल अशी वक्तव्ये करत आहेत. १४ ऑक्टोबर रोजी जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या सभेची कुचेष्टा करणारी, मराठा समाजाच्या भावना दुखावणारी वक्तव्ये केली आहे. तुम्ही महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळात असूनही असे वक्तव्य करीत आहेत. मंत्रिपदाच्या शपथेचा भंग करत आहात, असंही या नोटीसमध्ये म्हटलं आहे.
समता परिषदेच्या मेळाव्यात भाषण करताना अंतरवली सराटी येथील सभेबद्दल कुचेष्टा करणारी वक्तव्ये त्वरित मागे घेऊन मराठा समाजाची माफी मागावी, अन्यथा योग्य ती कायदेशीर कारवाई सुरू करू, असा इशारा देखील मंत्री छगन भुजबळ यांना या नोटीसमधून देण्यात आला आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते सतीश काळे यांनी वकिलांमार्फत मंत्री छगन भुजबळ यांना नोटीस धाडली होती. आरक्षणासाठी अनेक मराठा बांधवांनी बलिदान दिलं असताना मराठा समाजाची चेष्टा करणारं वक्तव्य मंत्री छगन भुजबळ हे करत आहेत. त्यांनी तात्काळ मराठा समाजाची माफी मागवी, अन्यथा कायदेशीर लढाईला सामोरे जावे, असं काळे यांनी नोटीसमध्ये म्हटलं होतं.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम