दै. बातमीदार । २४ फेब्रुवारी २०२३ । ‘सेल्फी’ चित्रपटामुळे अभिनेता अक्षय कुमार सध्या चर्चेत आहे. लवकरच त्याचा हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. सध्या तो या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. दरम्यान एका मुलाखतीत अक्षयने त्याच्या कॅनडाच्या नागरिकत्वावर खुलासा केला आहे. कॅनेडियन नागरिकत्वावरुन होणाऱ्या टीकेमुळे वाईट वाटते, असे तो म्हणाला आहे. भारतच माझ्यासाठी सर्वस्व आहे आणि मी आधीच पासपोर्ट बदलण्यासाठी अर्ज केला आहे, असे अक्षयने सांगितले.
अक्षय कुमार म्हणाला, “भारत माझ्यासाठी सर्व काही आहे. मी जे काही कमावले आहे, मी जे काही मिळवले ते येथील आहे. मी भाग्यवान आहे की, मला परत देण्याची संधी मिळते. कधी कधी वाईट वाटते जेव्हा लोक नकळत काहीही गोष्टी बोलतात.”
90च्या दशकात अक्षय कुमारचे 15 हून अधिक चित्रपट फ्लॉप झाले होते. याविषयी बोलताना तो म्हणाला की, 90 च्या दशकात माझे चित्रपट चालत नव्हते म्हणून मी कॅनेडियन नागरिकत्वासाठी अर्ज केला होता. अक्षय म्हणाला, “माझे चित्रपट चालत नव्हते मात्र काम तर करावे लागणार होते. मी कामासाठी कॅनडामध्ये गेलो कारण माझा मित्र कॅनडामध्ये होता आणि तो म्हणाला, इथे ये. मी अर्ज केला आणि मी गेलो.”
पुढे अक्षयने सांगितले, “त्याकाळात मात्र माझे दोन चित्रपट प्रदर्शित झाले आणि नशिबाने ते सुपरहिट ठरले. तेव्हा माझा मित्र म्हणाला, तू परत जा आणि पुन्हा काम सुरु कर. मला आणखी काही चित्रपट मिळाले आणि मला अधिक काम मिळत राहिले. त्यानंतर माझ्याकडे पासपोर्ट होता हे मी विसरलो. मी हा पासपोर्ट बदलला पाहिजे असा मला कधीही विचार नव्हता. परंतु होय, आता मी माझा पासपोर्ट बदलण्यासाठी अर्ज केला आहे,” असे अक्षयने सांगितले. कॅनेडियन नागरिकत्वामुळे अक्षय नेहमीच ट्रोलर्सच्या निशाण्यावर असतो. त्याचे कॅनडाचे नागरिकत्व हा नेहमीच लोकांमध्ये चर्चेचा विषय राहिला आहे. अक्षयने तीन वर्षांपूर्वी त्याच्या चाहत्यांना वचन दिले होते की, तो लवकरच भारतीय पासपोर्टसाठी अर्ज करेल.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम