तुमच्या पक्षातील नेते साधू का ? संजय राऊतांचा सवाल !
दै. बातमीदार । २७ फेब्रुवारी २०२३ । रविवारी दिल्लीतील आम आदमी पार्टीचे नेते आणि दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना सीबीआयने अटक केल्यानंतर या कारवाईवरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केंद्रातील भाजप सरकारवर जोरदार टीका केली आहे. भाजपला फक्त विरोधी पक्षातीलच नेते भ्रष्टाचारी असल्याचं दिसतं का? तुमच्या पक्षातील नेते काय साधू संत आहेत काय? असा सवाल करतानाच महाराष्ट्रात मंत्रालयाबाहेरचं झाड हलवलं तर भ्रष्टाचाराची प्रकरणे पटापटा बाहेर पडतील, असं संजय राऊत म्हणाले. तसेच देशातलं वातावरण आणीबाणीपेक्षाही भयंकर असल्याची टीकाही त्यांनी केली.
सध्याच्या राजकारणात विरोधकांबाबत पडद्यामागे काय कारस्थान सुरू आहे, त्याचा सुगावा लागत असतो. मला अटक करण्याची प्रक्रिया सुरु झाली. त्याचा सुगावा लागताच मला अटक होऊ शकते हे मी सांगितलं होतं. देशातलं वातावरण दिवसें न् दिवस आणीबाणीपेक्षाही भयंकर होताना दिसत आहे. राजकीय लोकांना विविध प्रकरणात गुंतवलं जात आहे. जे प्रश्न विचारत आहेत. त्यांना अटक केली जात आहे. त्यांना जामीन मिळू देत नाही. केंद्रीय यंत्रणांचा, महाराष्ट्रात पोलिसांचा वापर केला जात आहे. हे बेफामपणे सुरू आहे. ज्या राज्यात सत्ता नाही त्या राज्यात हे प्रकार सर्रास सुरू आहेत, असं संजय राऊत म्हणाले.
मनीष सिसोदिया हे दिल्लीचे उपमुख्यमंत्री आहेत. शिक्षण मंत्री म्हणून त्यांनी जगाला हेवा वाटावा असं काम केलंय. अबकारी धोरणाबाबत त्यांना अटक केली. असे निर्णय कॅबिनेटचे असतात. ते व्यक्तीचे नसतात. भुजबळ आणि देशमुखांना अटक केली होती. त्यावेळी त्यांनीही वैयक्तिक निर्णय घेतले नव्हते. ते कॅबिनेटचे निर्णय होते. दुर्देव आहे या देशाचं. या देशातील लोकशाही रोज खड्ड्यात जाताना दिसत आहेत. परवाच केजरीवाल उद्धव ठाकरेंना भेटले. या प्रसंगाला सामोरे जाऊन लढलं पाहिजे असं ठरलं, असं राऊत म्हणाले. सिसोदियांवर ज्याप्रकारची कारवाई झाली आहे. त्यानुसार केंद्र सरकार विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. जिथे सरकार नाही. जिथे सरकारला प्रश्न विचारला जात आहे. तिथे ईडी आणि सीबीआयचा दुरुपयोग केला जात आहे. किंवा सरेंडर होण्यास मजबूर करत आहे. मनिष सिसोदिया असो अनिल देशमुख असो, मलिक असो किंवा मी असो, आमच्यावर कारवाई करण्यात आली, अशी टीका त्यांनी केली.
भाजपमध्ये काय सर्व संत आणि महात्मे आहेत काय? देशाला दरदिवशी लुटलं जात आहे. रोज शंभर प्रकरणं येतील तुमचे. मंत्रालयाबाहेरचं झाड हलवलं तर भ्रष्टाचाराची शंभर प्रकरणं पटापटा पडतील. एलआयसीचे पैसे बुडवण्यात आले. पंजाब नॅशनल बँक कोणी बुडवली? सरकारचे दोस्त आहेत. त्यांना कोणी साधी नोटीस पाठवली का? विक्रांत घोटाळ्यात काय झालं? चौकशी सुरू होण्यापूर्वीच क्लिनचीट दिली. आम्ही तुरुंगात जाऊन आलो आहोत. तुम्ही कितीही अत्याचार करा. आम्ही आवाज उठवत राहू, लढत राहू. आम्ही सिसोदियांसोबत आहोत, असं त्यांनी स्पष्ट केलं.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम