ठाकरे गटाने भाजप नेत्याचे कौतुक करताच कॉंग्रेसला लागली जिव्हारी !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १५ एप्रिल २०२३ ।  राज्यात गेल्या काही महिन्यापासून भाजपवर टीकेची एकही संधी सोडत नसलेले ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी चक्क भाजपच्या नेत्याचे कौतुक केल्याने राज्याच्या राजकारणात अनेक चर्चा सुरु झाल्या आहे. त्यामुळे कॉंग्रेसच्या मात्र ते कौतुक जिव्हारी लागल्याचे चित्र दिसू लागले आहे.

नागपूर बदलत आहे, असे म्हणत संजय राऊत यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे कौतुक केले आहे. मात्र त्यांनी नागपूरच्या विकासाबाबत केलेल्या ट्विटमुळे नाना पटोलेंचा संताप अनावर झाला आहे. लोकांना काय अडचणी आहेत हे पाहा आणि मग बोला, असा टोला नाना पटोलेंनी राऊत यांना लगावला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये पहिली विराट वज्रमूठ सभा झाल्यानंतर रविवारी नागपुरात महाविकास आघाडीची दुसरी वज्रमूठ सभा होत आहे. या सभेतदेखील ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार आहे. संजय राऊत आज सकाळी नागपूरमध्ये दाखल झाले आहेत. त्याआधी त्यांनी ट्विट करत नितीन गडकरी यांचे कौतुक केले आहे.

संजय राऊत म्हणाले, नागपूर बदलत आहे. बदल स्पष्ट दिसतोय. याचे बरेचसे श्रेय नितिन गडकरी यांना द्यावे लागेल. 2024 ला नागपूरचे चित्रं पूर्ण बदललेले दिसेल. त्या बदलाचे श्रेय जनतेला द्यावे लागेल. सुडाचे इमले उध्वस्त होतील. आघाडीची सभा होऊ नये म्हणून भाजप आमदार मोर्चे काढतात. नागपूर इतके दुष्ट कधीच नव्हते.

संजय राऊत यांनी भाजप नेते तथा केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांच्या केलेल्या या कौतुकावरुन नाना पटोले यांनी राऊतांना टोला लगावला आहे. नाना पटोले म्हणाले, संजय राऊत यांच्या वक्तव्यावर मी फार बोलत नाही हे सर्वांना माहीत आहे. नागपूर काय सोसत आहेत, लोकांना काय अडचणी आहेत, किती कर लावला जातोय याबाबत संजय राऊत यांनी पाहावे. बाहेरच्या लोकांना सगळे चांगलेच दिसते. नागपुरात लुट सूरू आहे, हे संजय राऊत यांनी तपासावे मग विकास कळेल.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले छत्रपती संभाजीनगरनंतर आता नागपूरच्या वज्रमूठ सभेलाही उपस्थित राहणार नाहीत, अशा चर्चा रंगल्या होत्या. मात्र, नाना पटोले या सभेला उपस्थित राहणार, हे आता निश्चित झाले आहे. स्वत: नाना पटोले यांनी ही माहिती दिली आहे. त्यामुळे नाना पटोलेंच्या हजेरीबाबतच्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम