तपस्या करणाऱ्यांना अनुमोदन तरी द्यावे – पू. डॉ. पदमचंद्रजी म.सा.…

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २३ जुलै २०२२ । आपण तपस्या, उपवास व चांगल्या गोष्टींना नेहमीच प्रोत्साहन किंवा अनुमोदन दिले पाहिजे. आपल्याकडून उपवास होत नसेल तर निदान उपवासकर्ती व्यक्तीची साधी चौकशी तरी करा, तपस्या करणाऱ्यांना अनुमोदन तरी द्या, असे आवाहन अनुप्पेहा ध्यानप्रणेता डॉ. पदमचंद्र म.सा. यांनी स्वाध्याय भवन येथे चातुर्मास प्रवचन स्थळी केले. जयगच्छाधिपती 12 वे पट्टधर प.पू. पार्श्वचंद्रजी म.सा. व डॉ. पदमचंद्रजी म.सा. आदीठाणा 7 यांच्या पवित्र सान्निध्यात चातुर्मास कार्यक्रम सुरू आहे. त्यात श्रावक व श्राविकांना त्यांनी मार्गदर्शन केले.

जीवनात जितकी जास्त तपस्या कराल तितके उत्तम होय. अनेकांनी तर 11 दिवसांच्या उपवासाची तपस्या केलेली आहे त्या सर्व पवित्र आत्म्याचे अभिनंदन. तपस्या करणाऱ्यांना अनुमोदन करण्यात काटकसर करू नये. कारण अनुमोदना करणारा व तपस्या करणारा ह्या दोहोंना त्याचा लाभ मिळतो याबाबतचे महत्त्व त्यांनी पटवून दिले.

चातुर्मास प्रवचन श्रुंखलेच्या आजच्या प्रवचनात पू. जयेंद्रमुनी यांनी महत्त्वाच्या विषयावर चर्चा केली. विश्वास, निष्ठा, वचन आणि हृदय तोडू नये. हे तुटले तर याचा आवाज होत नाही परंतु त्याचा दूरगामी परिणाम मात्र होतो. त्याच प्रमाणे जी जन्म देते ती ‘माता’ आणि जी आपले घर सोडून जन्माची साथीदार बनून येते ती ‘पत्नी या दोहोंचे मन कधीच दुखवू नका…’ असा मोलाचा संदेश पू. जयेंद्रमुनी यांनी दिला.

प्रगती विद्यामंदिर येथे लोकमान्य टिळक जयंती साजरी

भगवान महावीर यांनी अनेकांतवाद सांगितला आहे. आपण जीवनात किती त्याचे पालन करतो यावर विचार करणे आवश्यक आहे. अनेकांतवाद सिद्धांत समजावून सांगताना त्यांनी सांगितले की, मी सांगतो तेच सत्य हे एकांतवाद व जे सत्य आहे ते माझे आहे हे म्हणजे अनेकांतवाद होय. सामान्य जीवन जगताना भगवान महावीर यांनी सांगितलेला मार्ग अवलंबला तर जीवनात काहीही अडचण निर्माण होत नाही. ‘मेरी भावना’ या प्रवचन श्रुंखलेत डॉ. पदमचंद्रजी म.सा. यांचे सुशिष्य पू. जयपुरंदरमुनी यांनी श्रावक-श्राविकांशी सुसंवाद साधला.

उद्या रविवारी 24 जुलै रोजी प.पू. डॉ. पदमचंद्रजी म.सा. यांचे सेवा-‘अनुकंपा’ या विषयावर सकाळी 9.00 ते 10.30 विशेष प्रवचन आणि दुपारी खास युवकांसाठी प्रवचनाच्या माध्यमातून मार्गदर्शनपर सुसंवाद देखील होणार आहे.

शब्दांकन – किशोर कुलकर्णी, पत्रकार, जैन इरिगेशन जळगाव.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम