ऑस्ट्रेलियाची आता अंतिम फेरीत भारताशी गाठ !

बातमी शेअर करा...

बातमीदार | १७ नोव्हेबर २०२३

पाच वेळच्या विश्वचषक विजेता ऑस्ट्रेलियाने आपल्यास बलाढ्य संघ का ओळखले जाते, याचा वस्तुपाठ उपांत्य फेरीत दाखवून दिला. डेव्हिड मिलरच्या (१०१) शतकानंतरही उपांत्य फेरीत द. आफ्रिकेन संघाचा डाव २१२ धावांवर कोलमडला प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाकडून अष्टपैलू ट्रेव्हिस हेडने (६२) अर्धशतक झळकावले. मात्र, तो बाद झाल्यानंतर सामन्यात रंगत निर्माण झाली. यष्टिरक्षक फलंदाज जोश इंगलिस (२८), मिचेल स्टार्क (१६) व कर्णधार पॅट कमिन्स (१४) या तळाच्या फलंदाजांच्या चिवट झुंजीमुळे ऑस्ट्रेलियाने ३ गडी व १६ चेंडू राखून रोमहर्षक विजयाची नोंद करत आफ्रिकन संघावर पुन्हा एकदा ‘चोकर्स’चा शिक्का मारला.

ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाजांचा सामना करताना द. आफ्रिकेचा डाव ४९.४ षटकांत २१२ धावांवर आटोपला. वेगवान गोलंदाजांत मिचेल स्टार्क व कर्णधार पॅट कमिन्स यांनी प्रत्येकी ३ बळी घेत त्यांच्या धावसंख्येला लगाम घातला, तर जोश हेझलवूड आणि कामचलाऊ फिरकी गोलंदाज ट्रेव्हिस हेडने प्रत्येकी २ फलंदाजांना माघारी धाडले. हेझलवूड आणि स्टार्क यांनी आफ्रिकेची आघाडीची फळी कापून काढली. अखेरचा विश्वचषक खेळणारा आणि आफ्रिकेकडून सर्वाधिक धावा काढणाऱ्या क्विंटन डी कॉकने (३) निर्णायक लढतीत निराशा केली. कर्णधार तेम्बा बावुमा (०) वान डर ड्युसेन (६) आणि एडन मार्कराम (१०) झटपट बाद झाले. मधल्या फळीतील डेव्हिड मिलर (१०१) आणि हेनरिच क्लासेन (४७) यांनी पाचव्या गड्यासाठी ९५ धावांची भागीदारी रचत डाव सावरला. फिरकीपटू हेडने अर्धशतकाच्या उंबरठ्यावर असलेल्या क्लासेनचा बळी घेतला. मिलरने त्यानंतर तळाच्या फलंदाजांना साथीला घेत धावसंख्येत भर घातली. मिलरने ८ चौकार व ५ षटकारांनी विश्वचषकातील पहिली शतकी खेळी साकारली. तळाचे फलंदाज गेराल्ड कोर्ट्झी (१९) व कॅगिसो रबाडा (१०) यांच्यामुळे आफ्रिकेचे द्विशतक धावफलकावर लागले.

डेव्हिड वॉर्नर आणि ट्रेव्हिस हेड यांनी लक्ष्याचा पाठलाग करताना अर्धशतकी सलामी दिली. हेडने ४८ चेंडूंत ९ चौकार व २ षटकारांनी सर्वाधिक ६२ धावा काढल्या. वॉर्नर ४ षटकार व १ चौकारने २९ धावा काढून परतला. मधल्या फळीतील मिचेल मार्श (०), मार्नस लबुछग्ने (१८) आणि ग्लेन मॅक्सवेल (१) झटपट बाद झाले. ऑस्ट्रेलियाने निम्मा संघ २४ षटकांत १३७ धावांवर गमावला आणि सामना रंगतदार वळणावर येऊन पोहोचला. स्टीव्हन स्मिथने २ चौकारांनी ३० धावा काढत इंगलिस सोबत सहाव्या गड्यासाठी ३७ धावांची भागीदारी रचली. इंगलिस स्टार्क जोडीने त्यानंतर सातव्या गड्यासाठी १९ धावा जोडत ऑस्ट्रेलियाला विजयाच्या जवळ पोहोचवून दिले. तळाचे फलंदाज स्टार्क व कमिन्स यांनी प्रतिकूल परिस्थितीत आठव्या गड्यासाठी २२ धावांची अभेद्य भागीदारी रचत ऑस्ट्रेलियाला ४७.२ षटकांत विजय मिळवून दिला.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम