दात स्वच्छ घासल्यानंतरही दुर्गंध येतोय ; हे करून पहा !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १० मार्च २०२३ । आपण आपले आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी नेहमी कार्यतत्पर असतो पण कधी कधी एका चुकीमुळे देखील त्रास जात नाही. दिवसातून दोनदा ब्रश करून दात स्वच्छ घासल्यानंतरही आपल्या तोंडातून दुर्गंधी येते. अशा वेळी इतरांशी संवाद साधताना लाज वाटते आणि आत्मविश्वासही कमी होतो. पण कधीकधी केवळ दात घासणं पुरेसं नसतं. कधीकधी तोंडातून दुर्गंधी येण्याचे कारण काहीतरी वेगळे असू शकते. म्हणूनच प्रथम ती कारणे समजून घेणे व त्यावर उपाययोजना करणे महत्त्वाचे आहे. तोंडातून दुर्गंध येण्याचे नेमके कारण काय आणि त्यावर काय उपाय करता येतील हे जाणून घेऊया.

दातांमधील कीड
तोंडातून दुर्गंध येण्याचे सर्वात सामान्य कारण म्हणजे दातांमधील कीड. जेवहा दोन दातांदरम्यान पोकळी निर्माण होते तेव्हा काहीवेळा दातांमध्ये क्रॅक होतात. अशा वेळेस खाल्लेल्या अन्नाचे बारीक कण बर्‍याचदा त्या पोकळीत अडकतात, जे सहसा ब्रश केल्याने दूर होत नाही. अन्नाचे असे कण जास्त वेळ अडकून राहिल्यास दात किडतात तसेच तोंडाला दुर्गंधी येऊ लागते. जर तुमच्या दाताला कीड लागली असेल किंवा दातांमध्ये फट अथवा पोकळी असेल तर वेळोवेळी दात स्वच्छ करत राहा. गरज पडल्यास दंतवैद्यांकडे जाऊन दात नीट साफ करून घ्या व दातांमधील फट बुजवा.

हिरड्यांमध्ये समस्या
काहीवेळा हिरड्यांमधील समस्यांमुळेही श्वासाला दुर्गंध येण्याचीही समस्या उद्भवते. हिरड्यांना त्रास होत असेल तर दातांवर प्लाक तयार होतो. प्लाक हा पिवळसर-पांढरा रंगाचा पदार्थ आहे. तो वेळेवर साफ न केल्यास श्वास दुर्गंधीचा त्रास सुरू होतो. यासोबतच हिरड्यांमध्ये जळजळ आणि अस्वस्थता देखील सुरू होते.

खाद्यपदार्थांचा वास
काही खाद्यपदार्थ असे असतात की त्यांच्या सेवनामुळे श्वासाच्या दुर्गंधीची समस्या उद्भवते. यामध्ये कांदा, लसूण यासारख्या गोष्टींचा समावेश आहे. खरंतर लसूण आणि कांद्यामध्ये असे घटक असतात, जे खाल्ल्यानंतर तोंडाला दुर्गंधी येऊ लागते, जी ब्रश करूनही जात नाही. कांदा किंवा लसणाचा वास दूर करण्यासाठी तुम्ही घरगुती उपाय करून पाहू शकता जसे लवंग तोंडात घेतल्याने तोंडातील दुर्गंधी दूर होऊ शकते. किंवा तुम्ही बडीशेप खाऊ शकता.

आरोग्य समस्या
अशा अनेक आरोग्य समस्या आहेत, ज्यामुळे तोंडाला दुर्गंधी येते. यामध्ये लिव्हर फंक्शन, किडनी समस्या, टाईप 2 डायबेटिस यासारख्या समस्यांचा समावेश आहे. याशिवाय, जर तुम्हाला कोरड्या तोंडाची समस्या असेल तर तुम्हाला श्वासाच्या दुर्गंधीची समस्या देखील असू शकते. जेव्हा तोंड कोरडे असते तेव्हा तोंडात कमी लाळ तयार होते. आपले तोंड स्वच्छ ठेवण्यासाठी लाळ खूप महत्वाची आहे. लाळेमध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ गुणधर्म असतो. तोंड कोरडे पडल्यास तोंडात वाईट बॅक्टेरिया तयार होतात, परिणामी श्वासाला आणि तोंडाला दुर्गंध येते.

अशी मिळवा तोंडाच्या दुर्गंधापासून मुक्तता
– दररोज दोनदा दात घासण्याव्यतिरिक्त, नियमितपणे आपल्या दंतवैद्याला भेट द्या आणि आपले दात स्वच्छ करा.
– दातांसोबतच जीभही स्वच्छ करत राहा.
– आरोग्यदायी गोष्टींचा आहारात समावेश करा.
– खाल्ल्यानंतर खळखळून चूळ भरा. दात नीट व नियमितपणे स्वच्छ करा. डेंटल फ्लॉसिंग देखील महत्वाचे आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम