‘बाईपण भारी देवा’ हिट ; इतका जमविला गल्ला !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १० जुलै २०२३ ।  गेल्या काही दिवसापासून राज्यातील अनेक चित्रपटगृहात अभिनेता, दिग्दर्शक केदार शिंदे यांचा ‘बाईपण भारी देवा’ हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजत असून तुफान कमाई देखील करीत आहे. ६ बहिणींची कथा सांगणाऱ्या या सिनेमाने पहिल्या दिवसापासून प्रेक्षकांची गर्दी खेचली आहे.

त्यामुळे अवघ्या काही दिवसांमध्ये या सिनेमाने तब्बल 12.50 कोटींचा गल्ला जमवला आहे. विशेष म्हणजे हा सिनेमा सुपरडुपर हिट होत असतानाच केदार शिंदेदेखील सोशल मीडियावर या सिनेमाशी संबंधित काही मजेशीर पोस्ट शेअर करत आहेत. यामध्येच आता त्यांनी सिनेमातील शशीला अटक झाल्याचं म्हटलं आहे. केदार शिंदे सोशल मीडियावर कमालीचे सक्रीय आहेत. त्यामुळे ते या सिनेमाचं जोरदार प्रमोशन करत आहेत. यामध्येच त्यांनी वंदना गुप्ते यांचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये त्या एका महिला पोलिसांसोबत दिसत आहेत. इतकंच नाही तर या महिला पोलिस वंदना गुप्ते यांना पोलिस व्हॅनमध्ये घेत आहेत. त्यामुळे हे नेमकं प्रकरण काय आहे ? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

“बाईपण भारी देवा या सिनेमाला फक्त महिलांचीच गर्दी का? या मुद्द्यावरुन सिनेमातील शशीला अटक. आता पुरुषांनी भरमसाठ गर्दी करुन तिला सोडवावे,” असं या फोटोवर लिहिण्यात आलं आहे. त्यामुळे हा केवळ एक मजेचा भाग असल्याचं लक्षात येतं. या सिनेमात वंदना गुप्ते यांनी शशी ही भूमिका साकारली आहे. दरम्यान, बाईपण भारी देवा हा सिनेमा ३० जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. या सिनेमामध्ये रोहिणी हट्ट्ंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या मोने, शिल्पा नवलकर, दीपा परब आणि सुचित्रा बांदेकर यांनी सिनेमात मुख्य भूमिका साकारली आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम