…पुन्हा बाळासाहेब ठाकरेंचे नाव सांगणार नाही ; ठाकरे गट आक्रमक !
दै. बातमीदार । २१ मे २०२३ । राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या महाविकास आघाडीतील ठाकरे गटाचा सर्वात आक्रमक चेहरा असलेले संजय राऊत आहेत. मविआ सरकार सत्तेत आल्यापासून ते मविआ सरकार पडेपर्यंत संजय राऊत सातत्याने भाजपावर टीका करताना दिसले. त्यानंतर शिंदे गट वेगळ्या झाल्यावर त्यांच्यावरही राऊतांनी वेळोवेळी तोफ डागली. आम्ही बाळासाहेबांची खरी शिवसेना आहोत, असे संजय राऊत आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजही म्हणताना दिसतात. तशातच आज, बीडच्या जाहीर सभेत संजय राऊतांनी तुफान आक्रमक पवित्रा घेत शिंदे गटाला एक ‘ओपन चॅलेंज’ दिलं.
“आमचे विरोधक आम्हाला म्हणतात की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावून तु्म्ही मते मागितलीत. असं अजिबात नाही. आमचे बाळासाहेब ठाकरे हे १ लाख मोदींवर भारी होते आणि आहेत. कर्नाटकात मोदींनी ३६ जाहीर सभा घेतल्या, २७ रोड शो केले, पण जिथे जिथे मोदींनी सभा घेतल्या त्या सर्व ठिकाणी भाजपाचा पराभव झाला. यावेळीही भाजपाने मोदींचे फोटो लावले होते, स्वत: मोदीही फिरले होते. मग पराभव का झाला? आता आमच्याकडून ४० ‘मिंधे’ गेले आहेत, त्यांनी मोदींचा फोटो लावून जिंकून येऊन दाखवावं, राजकारण सोडेन, पुन्हा बाळासाहेब ठाकरेंचे नाव सांगणार नाही”, असं खुलं आव्हान संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतच्या आमदारांना दिले.
“जे लोक आम्हाला सांगत आहेत की आम्ही मोदींच्या फोटोंवर निवडून आलो, त्या लोकांना मी सांगतो की, आम्ही बाळासाहेबांचा फोटो लावतो, तुम्ही मोदी-शाहांचा फोटो लावा. मग तुम्हालाही कळेल की महाराष्ट्र काय आहे, मराठी माणूस काय आहे आणि हिंदुत्व काय आहे. या महाराष्ट्राचं वातावरण झपाट्याने बदलत आहे. लोकांच्या मनात चीड आहे, संताप आहे. लोकं निवडणुकीची वाट पाहत आहेत. कधी एकदा निवडणुकीला सामोरे जातोय आणि या सरकारला खऱ्या अर्थाने ‘डिसमिस’ करतोय अशी लोकांची भावना आहे,” अशा शब्दांत संजय राऊतांनी भाजपाचा समाचार घेतला.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम