जळगावात भररस्त्यावर डॉक्टराला मारहाण !
बातमीदार | ३० ऑक्टोबर २०२३
शहरातील सिंधी कॉलनी परिसरातील पंचमुखी हनुमान मंदिर परिसरात असलेल्या रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यास आलेल्या डॉक्टर व त्यांच्या सहकाऱ्यांवर रविवारी २९ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास रुग्णालयाबाहेरील अतिक्रमणधारकांनी विनाकारण प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यात डॉक्टरांच्या सहकाऱ्याला हाताला कोयता लागल्याने तो जखमी झाला असून उपचार सुरु आहेत. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला तीन संशयितांसह एका महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हि महिला पोलीस असल्याची बतावणी करीत होती. दरम्यान, घटना सीसीटीव्हीत कैद झालेली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील प्रताप नगर येथील डॉ. नीरज चौधरी (वय ३३) असे फिर्यादी डॉक्टरचे नाव आहे. त्यांचे प्रताप नगरात रुग्णालय आहे. पंचमुखी हनुमान मंदिर परिसरातील निलकमल हॉस्पीटल येथे रुग्णाच्या शस्त्रक्रियेसाठी रविवारी २९ रोजी सकाळी ९. ३० वाजता सहकारी अजय सेनानी, मंगेश दांगोडे यांच्यासह गेले होते. तिथे डॉ. चौधरी यांनी (एमएच १९ सीएफ ५६२८) या चारचाकीने पोहोचले. तेथे डॉ. चौधरी वाहन पार्क करीत असताना एक वयं अंदाजे २५ वर्ष वयाचा इसम हात गाडीवर नारळ विक्री करणारा धावत आला. त्याने सांगीतले की, तुम्ही ज्या जागेवर गाडी पार्क केली आहे, त्या जागेवर मी नारळाची गाडी लावतो, तुम्ही गाडी काढून घ्या असे म्हणाला. तेव्हा डॉक्टरांनी, दुसरीकडे वाहन लावायला जागा नाही. हि सार्वजनिक जागा आहे, असे सांगून दवाखान्यात निघून गेले.
त्यानंतर १५ मिनिटांनी हॉस्पीटलचा कामगार निलेश पावरा याने डॉ. नीरज चौधरी यांना सांगितले की, नारळाचे हातगाडीवाला इसम तुमच्या वाहनाची तोडफोड करत आहे. तुम्ही खाली या असे सांगितल्याने ते बाहेर आले. तेव्हा नारळविक्रेता व त्याच्या सोबत असलेला एक इसम वय अंदाजे २५ वर्षे असे दोघे अचानक डॉ. चौधरी यांचे अंगावर धावून आले आणि दमदाटी करू लागले. तेव्हा डॉक्टरांचे सहकारी अजय सेनानी व मंगेश दांगोडे यांनी मध्ये पडून सोडविण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांनी त्यांना देखील मारहाण केली. एका इसमाने नारळाच्या हात गाडीवरील कोयता आणुन मंगेश दांगोडे याला मारण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्याचे हातातील कोयता मंगेश दांगोडे याचे उजव्या हाताच्या अंगठ्या जवळील तळव्याच्या भागाला लागून तो जखमी झाला. त्यानंतर त्या ठिकाणी एक महीला शिवीगाळ करत डॉक्टरांकडे येवून म्हणाली की, तु माझ्या आईला नारळाची गाडी का लावू देत नाही असे म्हणुन तिने डॉ. चौधरी यांना हाताबुक्यांनी मारहाण करून मी पोलीस आहे, तुला काय करायचे ते कर असे म्हणाली. त्यानंतर त्या ठिकाणी एमआयडीसी पोलीस दाखल झाले. सदर संशयितांची नावे अर्जुन राठोड, सोनु चव्हाण व एक महिला असल्याचे फिर्यादीने म्हटले आहे. घटनेप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे करीत आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम