कॉंग्रेसचा मोठा निर्णय ; दिल्लीत घेतल्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटी !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १७ जून २०२३ ।  देशात होणाऱ्या आगामी लोकसभा निवडणुकीच्या जागांचा आढावा घेताना मताचे विभाजन होणार नाही यावरही भर दिला जात असून,जागावाटपाचे सूत्र गुणवत्तेच्या आधारेच ठरेल, असा सूर आज प्रदेश काँग्रेसच्या बैठकीत दिसला.

गरवारे क्लब येथे आज काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक झाली. यावेळी, देश वाचविण्याची ही लढाई असून देश, लोकशाही, संविधान वाचवणे हे आमचे काम आहे. जागा वाटपाचा निर्णय मविआच्या बैठकीत गुणवत्तेच्या आधारावर होईल. भाजपचे सत्तेतून उच्चाटन करण्यासाठी समविचारी पक्ष एकत्र येऊन प्रयत्न करू, हाच आमचा मुख्य उद्देश आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केले.

या बैठकीला विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, तेलंगणचे प्रभारी माणिकराव ठाकरे, प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, बसवराज पाटील, चंद्रकांत हंडोरे उपस्थित होते. बैठकीनंतर पटोले म्हणाले की, काँग्रेसने लोकसभेच्या प्रत्येक जागेचा बारकाईने अभ्यास केला. मविआची बैठक होईल त्यावेळी प्रत्येक जागा कशी जिंकता येईल यावर आम्ही सर्वजण विचार करू. पुढील आठवड्यात इतर समविचारी पक्षांबरोबरही चर्चा करणार आहोत. वंचित बहुजन आघाडीने काँग्रेसकडे कोणताही प्रस्ताव दिलेला नाही जेव्हा त्यांचा प्रस्ताव येईल त्यानंतर त्यावर चर्चा करू. मविआने एकत्र राहून निवडणुका लढवाव्यात हीच काँग्रेस पक्षाची भूमिका आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम