मोठी बातमी : संजय राऊतांवर गुन्हा दाखल !
दै. बातमीदार । २० फेब्रुवारी २०२३ । राज्यातील शिंदे गटाला शिवसेना नावासह धनुष्यबाण मिळाल्यानंतर ठाकरे गट आक्रमक झाला आहे. तर दुसरीकडे नाशिकमध्ये संजय राऊत यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका केली होती. याप्रकरणी शिंदे गटाचे नेते योगेश बेलदार यांच्या तक्रारीवरून नाशिकच्या पंचवटी पोलिस ठाण्यात संजय राऊत यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर आता ठाण्यातही राऊत यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
निवडणुक आयोगाने शिवसेना हे नाव आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांना दिले आहे. निवडणुक आयोगाच्या या निर्णयानंतर ठाकरे गटातून मोठ्या प्रमाणावर टीका करण्यात येत आहे. संजय राऊत यांनी याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली होती. आता हेच प्रकरण त्यांच्या अंगलट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. संजय राऊत यांच्या विरोधात ठाण्यात शिवसेना महिला आघाडी आक्रमक झाली आहे. त्यांच्या विरोधात काल संध्याकाळी आंदोलन करण्यात आले. त्यानंतर ठाण्यात अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे.
ठाण्यातील नगर पोलिस ठाण्यात संजय राऊत यांच्या विरोधात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आलाय..
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे पुण्यात असताना उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली होती. अमित शहा म्हणाले, मुख्यमंत्रीपदाच्या लालसेपोटी उद्धव ठाकरे हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे तळवे चाटायला गेले. पण निवडणूक आयोगाने दूध का दूध. पानी का पानी केले. आणि याच वक्तव्यावरुन वादाला सुरुवात झाल्याचे पाहायला मिळाले.
अमित शहा यांना प्रत्युत्तर देताना संजय राऊत यांची देखील जीभ घसरल्याचे पाहायला मिळाले. संजय राऊत म्हणाले, हे लोक काय चाटत आहेत. ही चाटूगिरी महाराष्ट्रात कधीच झाली नव्हती. चाटूगिरीचे ढोंग आहे. टोकाची चाटूगिरी सुरू आहे. ज्यांची चाटली जातेय ते आम्हाला न्याय देत आहेत. अशाप्रकारची टीका संजय राऊत यांनी केली होती. आता हेच वक्तव्य त्यांच्या अंगलट आले आहे.
अमित शहा यांनी कालच्या कोल्हापूरात दौऱ्यात आगामी निवडणुका भाजप आणि शिवसेना एकत्रित लढणार असल्याची घोषणा केली. यावेळी त्यांनी मिशन इलेक्शनला अप्रत्यक्षपणे सुरुवात करत असल्याचे सांगितले. उद्धव ठाकरेंवर टीका करताना ते म्हणाले, मोदी यांचे मोठे फोटो लावले स्वतःचे छोटे फोटो लावले. देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात निवडणुका लढल्या आणि निवडणुकीनंतर यांच्या तोंडाला पाणी सुटले. आणि शरद पवारांच्या पायात जाऊन पडले.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम