मोठी बातमी : उद्धव ठाकरेंसह राऊतांना न्यायालयाचा समन्स !
दै. बातमीदार । २८ जून २०२३ । राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी दाखल केलेल्या मानहानी याचिका प्रकरणात न्यायालयाकडून शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांना न्यायालयाकडून समन्स बजावण्यात आला आहे. त्यामुळे या दोन्ही नेत्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. मुंबई न्यायदंडाधिकारी न्यायालयाकडून हे समन्स बजावण्यात आले. दोघांनाही 14 जुलै रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
सामना या वृत्तपत्रात आपल्याबद्दल बदनामीकारक मजकूर छापण्यात आल्याचा आरोप शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी केला होता. याविरोधात त्यांच्याकडून मानहानीची याचिका दाखल करण्यात आली होती. या प्रकरणात आता ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांना मुंबई न्यायदंडाधिकारी न्यायालयाकडून समन्स बजावण्यात आला आहे. येत्या 14 जुलै रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे आता उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
दंडाधिकारी न्यायालयाने ट्रॉम्बे पोलिसांना या प्रकरणाचा फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 202 अंतर्गत तपास करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर पोलिसांनी शेवाळे यांना बोलावून त्यांचा जबाब नोंदवला. शेवाळे यांनी ‘सामना’मध्ये प्रसिद्ध झालेला मूळ लेख पुरावा म्हणून सादर केला. न्यायालयीन कामकाजादरम्यान, असा युक्तिवाद करण्यात आला की शेवाळे यांनी आपले जीवन शिवसेनेसाठी समर्पित केले आहे. मात्र खासदार म्हणून खोट्या रिअल इस्टेट दाव्यांमुळे त्यांना गंभीर राजकीय परिणाम भोगावे लागले आहेत. जर तुम्ही म्हणत असाल की त्यांचा पाकिस्तानमध्ये रिअल इस्टेटचा व्यवसाय आहे, तर त्याचा अर्थ त्या देशाशी त्याचे चांगले संबंध आहेत. हे अत्यंत अनादरकारक आहे असा युक्तीवाद न्यायालयात करण्यात आला
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम