भारताची मोठी झेप : चीनला देखील टाकले मागे ; मंत्री गडकरी !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २८ जून २०२३ ।  देशातील पंतप्रधान नरेद्र मोदी यांच्या मंत्री मंडळातील रस्ते-वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या व्हिजनमुळे भारताने मोठी झेप घेतली आहे. जगात सर्वात मोठं रस्त्यांचं जाळं असणाऱ्या देशांमध्ये भारत आता दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. भारताने या बाबतीत चीनलाही मागे टाकलं आहे. या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर अमेरिका आहे.

मोदी सरकारने गेल्या नऊ वर्षांमध्ये देशात सुमारे ५४ हजार किलोमीटर लांबीचे नवीन राष्ट्रीय महामार्ग तयार केले आहेत. त्यामुळे देशातील एकूण महामार्गांची लांबी आता १.४५ लाख किलोमीटर एवढी झाली आहे. गडकरी यांनी मंगळवारी याबाबत माहिती दिली. ते म्हणाले, की गेल्या ९ वर्षांमध्ये देशातील रस्त्यांचं जाळं ५९ टक्क्यांनी वाढलं आहे.  गडकरी म्हणाले, की २०१३-१४ या आर्थिक वर्षात, देशामध्ये केवळ ९१ हजार २८७ किलोमीटर लांबीचे महामार्ग होते. मात्र, आज देशात १ लाख ४५ हजार २४० किलोमीटर लांबीचे महामार्ग आहेत. यांमध्ये ४४ हजारांहून अधिक दुपदरी महामार्गांना चौपदरी करण्यात आलं आहे. गेल्या ९ वर्षांमध्ये देशातील चौपदरी महामार्गांची लांबी दुप्पट झाली आहे. २०१४ साली चौपदरी महामार्गाची लांबी १८ हजार ३७१ किमी होती. जी आता वाढून ४४ हजार ६५७ किमी झाली आहे.

देशातील सर्वात मोठ्या दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेचं बांधकाम पूर्ण होत आल्याची माहिती देखील गडकरींनी यावेळी दिली. सोबतच, सध्या सॅटेलाईट आधारित टोल वसूल करण्याबाबत देखील तपासणी सुरू आहे. यानुसार एखादी गाडी महामार्गावर जेवढी धावेल, तेवढ्याच किलोमीटरचा टोल त्या गाडीला द्यावा लागेल. विशेष म्हणजे यामुळे टोल प्लाझांची गरज उरणार नाही, असं ते म्हणाले. यासोबतच, ईशान्य भारतात दोन लाख कोटी रुपयांचे महामार्ग तयार करण्यात येत आहेत. शिवाय, जम्मू-काश्मीर आणि लदाखमध्येही तेवढ्याच किंमतीचे बोगदे बनवण्यावर काम सुरू आहे अशी माहिती गडकरींनी यावेळी दिली.

सध्या जगात सर्वात मोठं रस्त्यांचं जाळं अमेरिकेत आहे. अमेरिकेत ६८ लाख ३ हजार ४७९ किलोमीटर लांबीचे रस्ते आहेत. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर भारत आहे. देशात सध्या ६३ लाख ७२ हजार ६१३ किलोमीटर लांबीचे रस्ते आहेत. यामध्ये महामार्ग आणि छोट्या रस्त्यांचा समावेश आहे. तर या यादीमध्ये तिसऱ्या क्रमांकावर चीन आहे. या देशात ५१ लाख ९८ हजार लांबीचे रस्ते आहेत.

 

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम