अजित पवारांना मोठा धक्का ; नवाब मलिक शरद पवारांसोबत !
बातमीदार | १७ ऑगस्ट २०२३ | राज्यातील राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर राज्याच्या राजकारणात अजित पवारांनी त्यांना बाहेर काढले असल्याच्या चर्चा सुरु असतांना त्यांनी आज आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यानुसार त्यांनी शरद पवार यांच्या नेतृत्वातील मूळ राष्ट्रवादी काँग्रेससोबत राहण्याचा निर्धार केला आहे. यामुळे ते राष्ट्रवादीच्या कोणत्या गटासोबत जाणार? या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.
ईडीने नवाब मलिक यांना मनी लाँड्रिंगप्रकरणी अटक केली होती. सुप्रीम कोर्टाने नुकताच त्यांना जामीन मंजूर केला. त्यानंतर ते राष्ट्रवादीच्या कोणत्या गटात जाणार? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. या पार्श्वभूमीवर नवाब मलिक यांनी ‘टाइम्स ऑफ इंडिया’ या इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
नवाब मलिक यांनी शरद पवारांसोबत कायम राहण्याचा निर्णय घेतला आहे. मी कोणत्याही गटात जाणार नाही. मी मूळ राष्ट्रवादी काँग्रेससोबत राहणार आहे, असे ते म्हणालेत. मागील 18 महिन्यांच्या काळात माझ्यासह माझ्या कुटुंबाला मोठा मनस्ताप सहन करावा लागला. विशेषतः मूत्रपिंडाच्या दुर्धर आजारामुळे मला स्वतःलाही मोठा त्रास सहन करावा लागला. सद्यस्थितीत प्रकृती काळजी घेण्यास माझे प्राधान्य आहे. त्यानुसार मी शहरातील सर्वात चांगल्या डॉक्टरांकडून उपचार घेईल. त्यानंतर महिन्याभरात माझी प्रकृती सामान्य होईल असा मला विश्वास आहे, असेही मलिक यावेळी म्हणालेत.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम