अंडरकटिंग मोबाईल विक्रीचे मोठे रॅकेट; यंत्रणा गाफिल

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २० सप्टेंबर २०२२ । आजकाल सर्वच कामे ऑनलाइन झाल्यामुळे मोबाईलचा वापर दिवसेंदिवस वाढत जात आहे. पैसे व वेळ वाचवण्यासाठी बरेचसे लोक जरी ऑनलाइन खरेदीला प्राधान्य देत असले तरी कित्येक ग्राहक ऑफलाईन खरेदीलाच विशेष पसंती देतात. परंतु या वाढत्या मोबाईलच्या विक्रीबरोबरच जळगावात अंडरकटिंग मोबाईल विक्रीचे रॅकेट सुरू असण्याची शक्यता असल्याचे वृत्त आहे.

शहरातील गोलाणी मार्केट हे मोबाईलचे मोठे हब मानले जाते. याच मार्केटमध्ये मोबाईल विक्रीमुळे दिवसागणिक दररोज लाखोंची-कोट्यवधींची उलाढाल होत असते. मात्र, सणासुदीच्या व सेलच्या काळात ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक ई-कॉमर्स साईट भरघोस सूट व सवलती देतात. याच गोष्टीचा फायदा घेत या रॅकेटमधील टोळी एकाच पत्त्यावर अनेक मोबाईल बुक करून घेते. अगोदर सवय झालेली असल्याने ताबडतोब माहिती भरणे आणि मोबाईल नोंदणी करणे त्यांना सोपे होते.

ही टोळी महाराष्ट्रातील एखाद्या विशिष्ट स्थळावरून हे काम करत असते. शहरातील दुकानदाराने अगोदरच ऑर्डर दिलेली असल्यामुळे असे एकाहून अधिक मोबाईल अज्ञात किंवा सहज न समजणाऱ्या ठिकाणी कुरियर अथवा पार्सल सुविधेने मागवले जातात.

सूट व सवलत मिळालेले अशा अनेक मोबाईलच्या मागे एक ठराविक कमिशन असते, त्याचबरोबर इतर ग्राहकांना हेच मोबाईल ऑफर संपलेल्या दरात विकले जातात, यामुळे मोबाईल विक्रेत्यांना भरपूर नफा होतो आणि ग्राहकही फायदा बघून खरेदी करतात. पण या फायद्याच्या नादात, एकच मोबाईल दोन व्यक्तींच्या नावे विक्री केला जात आहे, हे ग्राहकांच्या लक्षात येत नाही.

अशा ऑर्डर्समुळे सेलवरील मोबाईल क्षणार्धात आऊट ऑफ स्टॉक होऊन जातात, म्हणून इतर ग्राहकांना लवकर ऑनलाईन मोबाईल खरेदी करता येत नाही. आता सध्या स्थानिक ग्राहकांना मोबाईल खरेदीचे बिल जरी मिळत असले, तरी कंपन्यांकडे इतर व्यक्तीच्या नावे नोंदणी असल्यामुळे वापरकर्त्यास भविष्यात अडचण येण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

दरम्यान, पोलीस, आयकर व सेवा उत्पादन शुल्क विभागाचे याकडे लक्ष नसले तरी ह्या लाखोंच्या उलाढाली व कारभार हा नियमबाह्य आहे हे निश्चितच!

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम