भाजपने आखली रणनिती ; राज्यातील जिल्हाध्यक्ष बदलणार !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ५ जून २०२३ ।  देशातील सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपने आगामी काळातील निवडणुकीसाठी आपल्या रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे. भारतीय जनता पक्षाचे राज्याच्या सर्व महानगर, जिल्ह्यांचे अध्यक्ष बदलण्यात येतील अशी दाट शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीला काही महिने शिल्लक असताना नव्या दमाच्या लोकांना संधी देण्याचा विचार पक्षनेतृत्वाने केला आहे.

BJP add

प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे भाजपचे ७० टक्के जिल्हाध्यक्ष बदलणार असल्याचे दोन अडीच महिन्यांपासून सांगत आहेत. त्यामुळे आता आपल्या अध्यक्षपदाला राहिलेच किती दिवस हा विचार करून बरेच जिल्हाध्यक्ष उदासीन झाले आहेत. जिल्हाध्यक्षपदासाठी इच्छुक असलेले जिल्ह्याजिल्ह्यातील नेते मुंबईत चकरा मारत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या गाठीभेटी घेत आहेत. बावनकुळे यांनी आधी ७० टक्के जिल्हाध्यक्ष बदलाचे संकेत दिले होते. पण खात्रीलायक सूत्रांनी सांगितले की १०० टक्के नवीन चेहरे देण्याचा निर्णय झाला आहे. पक्षासाठीचे योगदान, कार्यकर्त्यांच्या भावना, पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांकडून मिळालेला फीडबॅक आणि संघ परिवारातील प्रमुख व्यक्तींनी दिलेला सल्ला या आधारावर नवीन नियुक्त्या करण्यात येतील असेही सूत्रांनी सांगितले. मोदी @ ९ हे अभियान ३० जूनपर्यंत चालणार आहे, त्याच्या मध्येच बदल करायचे की नंतर यावर अद्याप निर्णय झालेला नाही.

आमदारांना संधी नाही?
भाजपने राज्यात लोकसभेच्या किमान ४२ जागा जिंकण्याचे मिशन हाती घेतले आहे. ते यशस्वी करायचे तर आमदारांना जिल्हाध्यक्ष पदाच्या जबाबदारीतून मोकळे करायचे व लोकसभा निवडणुकीसाठी तयार केल्या जाणाऱ्या समित्यांमध्ये घ्यायचे असा विचार केला जात आहे. डझनभर जिल्हाध्यक्ष वा महानगर अध्यक्ष हे विद्यमान आमदार आहेत. आता नवीन जिल्हाध्यक्ष नेमताना आमदारांना संधी द्यायची नाही असा निर्णय झाल्याचे कळते.

 

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम