भाजप नेत्याचा शिंदे गटाला टोला ; जागा वाटपाबाबत विधान !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २६ मार्च २०२३ ।  राज्यातील सर्वच पक्षांनी निवडणुकीसाठी सज्ज झाले असून त्यासाठी राज्यात आपापल्या पक्षाची संघटनात्मक बांधणी करण्यासाठी नेते आता दौरे करू लागले आहे. तर शिंदे व भाजपच्या काही नेत्यामध्ये जागा वाटपावरून आतापासून एकमेकांना टोला लगाविणे सुरु आहे.

शिवसेनेला आगामी लोकसभा निवडणुकीत 22 आणि विधानसभेला 126 जागा मिळाल्याच पाहिजेत, अशी भूमिका खासदार गजानन किर्तीकर यांनी घेतली आहे. मात्र जागावाटपाचा फॉर्म्युला असा टीव्हीवर ठरत नसतो, अशाप्रकारचा टोला भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी शिंदे गटाला लगावला आहे. शिंदे गटाला शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिळाल्यानंतर शिंदे गटातील नेते चांगलेच सक्रिय झालेले पाहायला मिळत आहे. येणाऱ्या निवडणुकांमध्ये भाजप आणि शिवसेना सोबत लढणार असल्याची घोषणा केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी कोल्हापूरात केली होती. मात्र भाजप आणि शिवसेना किती जागा लढवणार याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

चंद्रशेखर बावनकुळे यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. यात ते म्हणाले होते, 2024 मध्ये भाजपचे 150 ते 170 आमदार 100 टक्के निवडून येतील. भाजप 240 च्या आसपास जागा लढण्याच्या विचारात आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटाकडे 50 पेक्षा जास्त आमदार नाहीत. आपण 240 जागा लढवल्या तर कार्यकर्त्यांना खूप काम करावे लागणार आहे. त्यातून त्यांनी शिवसेनेला विधानसभेसाठी फक्त 50 जागा देणार असल्याचे सांगितले होते.

शिवसेनेचे संसदीय पक्षाचे नेते गजानन किर्तीकर यांनी जागा वाटपाबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, 2019 च्या फॉर्म्युल्यात कुठलाही बदल होणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना कमजोर नाही. पूर्वी युती असताना विधानसभेला शिवसेनाला 122 तर भाजपला 162 हा फॉर्म्युला होता. आताही युती आहे. त्यामुळे हाच फॉर्म्युला कायम राहणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यावर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार म्हणाले, निवडणूक अजून 1 वर्षावर आहे. जागावाटपाचा फॉर्म्युला हा माईकवरून, पत्रकार परिषदेतून, टीव्ही चॅनेलवरून कधीच ठरत नाही. केंद्रात अमितभाई, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यासाठी एकत्र बसतील. जागावाटपाचा फॉर्म्युला पत्रकार परिषदेत ठरायला लागला तर हे काही पोषक वातावरण होऊ शकत नाही, असेही मुनगंटीवार म्हणाले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम